दोन एकर डाळिंबाची बाग जळून खाक; शेतकऱ्याचे ६ लाख रुपयांचे नुकसान
By रेवणसिद्ध जवळेकर | Published: March 25, 2023 04:44 PM2023-03-25T16:44:47+5:302023-03-25T16:47:00+5:30
शेतकऱ्याचे ६ लाख रुपयांचे नुकसान
रेवणसिद्ध जवळेकर
मंगळवेढा - महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे डाळिंब बागेतून गेलेल्या विद्युत खांबावरील तारांचे घर्षण होऊन गणेशवाडी (ता.मंगळवेढा) येथील एका शेतकऱ्याची लाखो रुपयांचे उत्पन्न देणारी डाळिंब बाग , ठिबक सिंचन पाईप जळुन खाक झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास घडली. यामुळे सदरील शेतकरी पूर्णतः रस्त्यावर आला असून त्याच्या डोळ्यादेखत त्याचे उपजीविकेचे साधन जळत असतांना त्याना व त्याच्या कुटुंबियांना आश्रु अनावर झाले होते.
आनंद दामू गुंगे यांची गणेशवाडी शिवारात गट नंबर १०२ /२/अ मध्ये दोन एकर डाळिंब शेती असुन यात ६००च्या आसपास झाडांची फळाला लागलेली डाळिंब बाग आहे. याच शेतात हायवेवरील लाईन शिफ्ट केली असून यावरील जम्प तुटलेला होता येथे लग्ज घालण्यात आला नव्हता . तारेचा पीळ दिला होता त्यामुळे वारंवार घर्षण होऊन ठिणग्या पडत होत्या याबाबत महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना बदलण्याबाबत सांगण्यात आले होते. मात्र याकडे दुर्लक्ष केले गेले. शुक्रवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास शॉर्टसर्किट होऊन ठिणग्या पडून सर्वच्या सर्व ६०० डाळिंब झाडे जळून खाक झाली.तेच ठिबक सिंचन पाईप जळून खाक झाले आहेत. डाळिंब बाग जोपासण्यासाठी शेतकरी गुंगे व त्यांच्या कुटुंबियांनी खूप मेहनत केली होती. उन्हा-तान्हात कष्ट तर केलेच शिवाय झाडा़ना फळधारणा व्हावी म्हणून रासायनिक खते व औषधासाठी मोठा खर्च केला होता. त्यामुळे त्यांचे खूप मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. बऱ्याच ठिकाणी महावितरण कंपनीच्या विद्युत खांबावरील तार खूप जीर्ण झाल्या असून ते केव्हाही तुटतात. एकत्र जमा होतात. त्यामुळे ताराखाली असलेला शेतकऱ्यांची शेती जळून जाते. मंगळवेढा नगरपालिका अग्निशमक दलाने तत्काळ बोलवून सदरचे आग विझवण्याचा प्रयत्न केला असून जळालेल्या डाळिंब बागेची नुकसान भरपाई त्वरित मिळावी अशी मागणी आनंद गुगे यांनी महावितरण उपकार्यकारी अभियंता यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे. तलाठी यांनी नुकसानीचा पंचनामा केला आहे मात्र महावितरण अधिकारी अद्याप इकडे फिरकले नाहीत.
शॉर्टसर्किट मुळे माझी दोन एकर डाळिंब बाग व ठिबक सिंचन सह अन्य साहित्य जळून सहा लाखाचे नुकसान झाले आहे. महावितरणकडून मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे तात्काळ नुकसानीचा पंचनामा करून महावितरणने नुकसान भरपाई द्यावी
आनंद गुंगे , शेतकरी