स्मशानभुमी नसल्यानं मागासवर्गीय मृत व्यक्तीचा रस्त्यावरच अंत्यविधी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2022 16:31 IST2022-01-22T16:30:53+5:302022-01-22T16:31:22+5:30
२००६-२००७ मध्ये घोडेश्वर येथे गट नं १/१ मध्ये २० गुंठे जमीन मातंग व रामोशीला समाजाला देण्यात आली आहे.या जमिनीमधून नागपूर-रत्नागिरी हा महामार्ग गेला.

स्मशानभुमी नसल्यानं मागासवर्गीय मृत व्यक्तीचा रस्त्यावरच अंत्यविधी
सोलापूर - मोहोळ तालुक्यातील घोडेश्वर येथे मागासवर्गीय स्मशानभूमी नसल्याने मृत व्यक्तीचे रस्त्यावरच अंत्यसंस्कार करण्यात आले. घोडेश्वर येथील नागरिकांनी मागासवर्गीय स्मशानभूमीची मागणी खूपवेळा केली आहे. परंतु जागेचा फेरफार स्वातंत्र्य मिळत नसल्याने ह्या मागणीची पूर्तता केली जात नाही. थोडक्यात जागा असून खोळंबा नसून अडचण अशी परिस्थिती झाली आहे.
२००६-२००७ मध्ये घोडेश्वर येथे गट नं १/१ मध्ये २० गुंठे जमीन मातंग व रामोशीला समाजाला देण्यात आली आहे.या जमिनीमधून नागपूर-रत्नागिरी हा महामार्ग गेला. पूर्वीपासून हा समाज या ठिकाणी मृतांचे अंत्यसंस्कार करत होते. स्थानिक नागरिकांकडून अनेकदा या ठिकाणी स्मशानभूमीची मागणी झाली आहे. आजतागायत दोन मृतदेहाचे अंत्यसंस्कार रस्त्यावरच केले आहेत. मागील आठवड्यात मातंग समाजाचे भाऊसाहेब अष्ठूळ (वय ४५) याचे निधन झाले. स्मशानभूमीची जागा निश्चित व स्मशानभूमी नसल्याने त्यांच्या मृतदेहावर रस्त्याच्या कडेला मोकळ्या जागेत अंत्यविधी केला. अशा मोठ्या गावात मागासवर्गीय समाजाकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष झाल्याचे दिसते.
मातंग-रामोशी समाजाला २० गुंठे जागा
सन २००५-२००६ मध्ये मातंग-मुस्लिम समाजाला गट नं १/१ मधील ५० गुंठे जमीन दिल्याची नोंद आहे. पुढे २००६-२००७ यामधील मुस्लिम समाजाला स्वतंत्र ५० गुंठे जमीन देण्यात आली. याच साली मातंग-रामोशी समाजाला २० गुंठे जमीन दिल्याची नोंद आहे. मातंग आणि रामोशी समाजाला देण्यात आलेल्या स्वतंत्र २० गुंठ्याचा फेरफार मिळून येत नाही.परिणामी या दोन्ही समाजाची अवहेलना होत आहे.
७/१२ उतारा मिळतो,फेरफार नाही ?
सन २००६-२००७ मध्ये मातंग व रामोशी समाजाला २० गुंठे जमिनीची नोंद असल्याचा ७/१२ मिळतो,फेरफार का मिळत नाही, असा सवाल येथील मागासवर्गीय समाजाने केला. त्यावेळच्या स्थानिक प्रशासनाकडून दुर्लक्ष झाल्याची बाब समोर येत आहे. प्रशासनाच्या अकार्यक्षमतेमुळे हा समाज स्मशानभूमीपासून वंचित आहे.
२०१०-२०१५ साली पत्र्याचे शेड मंजूर
सन २०१०-२०१५ या कालावधीत मातंग-रामोशी समाजाला स्मशानभूमीसाठी पत्र्याचे शेड मंजूर झाले होते. पत्र्याच्या शेडची मंजुरी असल्याने या ठिकाणी पाया खोदण्याचे काम चालू करण्यात आले होते.अचानक पाया खोदण्याचे काम थांबवण्यात आल्याची माहिती महादेव कसबे रा. घोडेश्वर ता.मोहोळ यांनी सांगितले.
घोडेश्वर येथील गट नं १/१ मध्ये एकूण १०.३७ हेक्टर जमीन आहे. यामधील विभागणी केलेल्या जमिनीचा प्रत्येक फेरफार आहे. परंतु मातंग व रामोशी समाजाला देण्यात आलेल्या ७/१२ चा फेरफार नंबर मिळत नाही. यामुळे मंडल अधिकारी, तलाठी यांच्याकडे पाठपुरावा चालू आहे. फेरफार नोंद होऊन जागेचा पंचनामा झाल्यास स्मशानभूमीसाठी पाठपुरावा करण्यात येईल.
-हरी पवार, ग्रामसेवक, घोडेश्वर