बाधित मातेच्या कोरोनामुक्तीसाठी आशा वर्कर्सची धडपड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:23 AM2021-05-26T04:23:25+5:302021-05-26T04:23:25+5:30
श्रीपूर : सर्व जगात कोरोनाने थैमान घातले आहे. सामाजिक वातावरण बिघडल्याने असुरक्षितता जाणवत आहे. या भयावह काळात आशेचा किरण ...
श्रीपूर : सर्व जगात कोरोनाने थैमान घातले आहे. सामाजिक वातावरण बिघडल्याने असुरक्षितता जाणवत आहे. या भयावह काळात आशेचा किरण दिसला, तो म्हणजे महाळुंग आरोग्यवर्धिनी केंद्रात आशा वर्कर्स यांनी कोविडबाधित मातेसह एक वर्षाच्या मुलाची घेतलेली काळजी अन् दाखवलेली माणुसकी. अजूनही मानवता, चांगुलपणा शिल्लक असल्याचे त्यांनी दाखवून दिले आहे.
कोरोना पार्श्वभूमीवर जवळचे मित्र, नातेवाईक भेटण्याचे टाळतात. महाळुंग प्राथमिक आरोग्य केंद्रातील आशा वर्कर्स प्रबोधनाबरोबरच उपचार मिळवून धडपडत आहेत. सुनीता नाना भोसले (रा. महाळुंग) या कोरोनाबाधित होत्या. त्यांना एक वर्षाचे मूल आहे. त्या बाळाची व बाधित मातेची काळजी घेणे खूप जिकिरीचे होते. आशा वर्कर्स यांनी या मातेची काळजी घेतली.
कोरोनातून बरे होऊन या मातेला सोडण्याचा प्रसंग आला तेव्हा आशा वर्कर्स यांनी त्या मातेवर व बाळावर पुष्पवृष्टी केली. उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात हा आनंदोत्सव साजरा केला. डोळ्यांना सुखावणारा प्रसंग होता.
विजया नाईकनवरे, शुभांगी भोसले, उज्ज्वला भोसले, सुवर्णा भोसले, मंजूषा कोळी, विद्या शिवणगी, दीपाली नायगावकर, ज्योती गेजगे, रोहिणी जाधव या कोरोनामुक्तीसाठी प्रयत्न करीत आहेत.
याशिवाय महाळुंग आरोग्यवर्धिनी केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. सुमित्रा कुरुळे, डॉ. शुभम फडे, अण्णासाहेब माळी, फार्मासिस्ट ज्योती लोखंडे, परिचारिका शीतल खिलारे, परिचारिका शुभांगी धाईंजे, परिचारिका महेश लोकेवार, तुषार कदम, सोमनाथ होडगे, विशाल जाधव, नागेश काटे, सुषमा खरात, आशा मोहिते, मयूर थिटे यांनी बाधित मातेसह मुलाला कोरोनातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले. आरोग्य केंद्रातून मुलाला आणि मातेला निरोप देताना डॉ. भारत गायकवाड, आरपीआयचे श्यामराव भोसले, दत्ता माने उपस्थित होते.