आषाढी वारी २०२३ : भाविकांच्या मदतीसाठी २५ हजार अधिकारी अन् कर्मचारी असणार तैनात
By Appasaheb.patil | Published: June 9, 2023 01:45 PM2023-06-09T13:45:06+5:302023-06-09T13:45:26+5:30
सर्व भाविकांची सोय व सेवासुविधा पुरविण्यासाठी विविध पातळीवर जिल्हा प्रशासन प्रयत्न करीत आहे.
सोलापूर : आषाढी वारी पालखी सोहळ्यासाठी सोलापूर जिल्हा प्रशासनाकडून पालखी तळावर, मार्गावर वारकरी भाविकांसाठी देण्यात येणाऱ्या सोयी सुविधांसाठी २५ हजार ५०० अधिकारी कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यांना आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत आवश्यक ते प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी लोकमतशी बोलताना दिली.
आषाढ एकादशी २९ जून २०२३ रोजी आहे. ह्या निमित्ताने पंढरपूर शहरामध्ये भरणारी आषाढी यात्रा २२ जून ते ६ जुलै या कालावधीत होणार आहे. पंढरपूर आषाढी वारीसाठी संतश्रेष्ठ श्री संत ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज आणि अन्य संतांच्या पालखी सोहळ्यासोबत आषाढी वारीसाठी मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक येतात. राज्यासह अन्य राज्यातील भाविकांची गर्दी पंढरपुरात होते. आलेल्या सर्व भाविकांची सोय व सेवासुविधा पुरविण्यासाठी विविध पातळीवर जिल्हा प्रशासन प्रयत्न करीत आहे.
दरम्यान, पालखी सोहळ्यासाठी ४९ टँकर्स, ३० ठिकाणी गॅस वितरण व्यवस्था, २६ हजार, १८२ शौचालयांची उपलब्धता, पालखी मुक्कामाच्या ठिकाणी मुबलक पाणी पुरवठा, स्वच्छता, विद्युत व्यवस्था, आरोग्य सुविधा आदि बाबतची माहिती ठोंबरे यांनी यावेळी दिली.