आषाढी वारी; वारकऱ्यांची तहान भागवित आहेत इंजिनिअरिंगचे विद्यार्थी अन् प्राध्यापक
By Appasaheb.patil | Published: July 16, 2024 07:36 PM2024-07-16T19:36:49+5:302024-07-16T19:39:13+5:30
आषाढी वारीतील दिंडीतील वारकऱ्यांचा सहभाग पाहता यंदा वारीत वारकऱ्यांची गर्दी अधिक होण्याची चिन्हे दिसत आहेत...
सोलापूर : श्री. विठ्ठलाच्या भेटीसाठीआतूर झालेल्या वारकऱ्यांची तहान दरवर्षीप्रमाणे यंदाही स्वेरीचे विद्यार्थी भागवित आहेत. या उपक्रमात श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित असलेल्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (डिग्री), कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (डिप्लोमा), डी.फार्मसी व बी.फार्मसी या चारही महाविद्यालयातील, उपप्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक व विद्यार्थी असे शेकडो जण सहभागी झाले आहेत.
आषाढी वारीतील दिंडीतील वारकऱ्यांचा सहभाग पाहता यंदा वारीत वारकऱ्यांची गर्दी अधिक होण्याची चिन्हे दिसत आहेत. परंपरेप्रमाणे दर्शन रांगेतील वारकऱ्यांना आर.ओ. फिल्टर्ड पिण्याचे पाणी वाटपाचे कार्य २४ तास सुरू आहे. वारकऱ्यांच्या उपस्थितीत रिद्धी सिद्धी गणपती मंदिरालगत असणाऱ्या पत्राशेड मधील दर्शन मंडप रांगेतील वारकऱ्यांना पिण्याचे शुद्ध पाणी देण्यात येत आहे. सकाळी ८ ते सायंकाळी ८ या वेळेत गोपाळपूर, रिध्दी-सिध्दी मंदिर व दर्शन बारी, पत्रा शेड या ठिकाणी विद्यार्थी वारकऱ्यांना प्रचंड उत्साहाने आर.ओ. फिल्टर्ड पाण्याचे वाटप करत आहेत. शेकडो विद्यार्थी ग्लास, वॉटर जग आणि वॉटर टॅंकद्वारे पाणी वारकऱ्यांपर्यंत पोहचवून वारकऱ्यांची तहान भागवत आहेत. दररोज साधारण आठ ते दहा हजार लिटर पाण्याचे वाटप केले जात आहे. या उपक्रमाच्या उदघाटन माजी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केले. दरम्यान, कॉलेजमधून इतर सहकारी पाणी आणून दर्शन रांगेजवळ असलेल्या टाक्यात साठवतात. त्यानंतर ‘राष्ट्रीय सेवा योजना’ व ‘कमवा व शिका’ योजनेतील विद्यार्थी मोठ्या उत्साहाने वारकऱ्यांना पाणी वाटप करत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
विनोद तावडेंच्या फेसबुक पेजवर स्वेरीचे कौतुक
राज्याचे माजी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आपल्या फेसबुक पेजवरून स्वेरीच्या कार्याचे कौतुक करताना लिहिले आहे की, ‘महाराष्ट्राच्या श्रद्धेचा आणि भक्तीचा सोहळा असलेल्या आषाढी एकादशी निमित्त लाखो वारकरी व भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला येतात. या विठू भक्तांना पिण्याच्या शुद्ध पाण्याचे मोफत वाटप करण्याचा अतिशय स्तुत्य उपक्रम पंढरपूरच्या श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित विविध महाविद्यालयांच्या संयुक्त विद्यमाने हाती घेण्यात आला आहे.