आषाढी वारी सोहळा ; दर्शन रांगेत उभारतील दीड लाख भाविक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 02:13 PM2018-07-18T14:13:26+5:302018-07-18T14:15:52+5:30

मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी सचिन ढोले यांची माहिती, भाविकांसाठी ३ किमीचे मॅट; १५ लाख लिटर शुद्ध पाण्याची सोय

Ashadhi Vari Sohala; 1.5 lakh devotees to be built in the Darshan queue | आषाढी वारी सोहळा ; दर्शन रांगेत उभारतील दीड लाख भाविक

आषाढी वारी सोहळा ; दर्शन रांगेत उभारतील दीड लाख भाविक

Next
ठळक मुद्देदर्शन रांगेत असणार २० एलसीडी टीव्हीमंदिर समितीने भाविकांना रांगेत अधिक सुविधा देण्याचा केला निर्धार मंदिर समितीने तात्पुरत्या शेडची संख्या वाढवली

प्रभू पुजारी
पंढरपूर : श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने स्कायवॉकनंतर पत्राशेड आणि पुढे बांबू उभारून दर्शन रांगेत एकाचवेळी सुमारे दीड लाख भाविक उभा राहू शकतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे़ शिवाय या भाविकांना १५ लाख लिटर शुद्ध पाणी देण्याचे नियोजन केले आहे. पाऊस, चिखल यापासून त्यांचे संरक्षण व्हावे म्हणून वॉटरप्रूफ शेड्स, शेडमध्ये २८ हजार चौरस फुटाचे म्हणजेच सुमारे ३ किलोमीटर अंतरावर मॅट अंथरले आहे. त्यामुळे भाविकांनी शिस्तीत विठ्ठल दर्शन घेऊन यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी सचिन ढोले यांनी केले़ 

आषाढी वारी सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपºयातून लाखोंच्या संख्येने भाविक पांडुरंगाच्या दर्शनासाठी येतात़ चंद्रभागेत पवित्र स्नान झाल्यानंतर भाविक पदस्पर्श दर्शनासाठी दर्शन रांगेत सहभागी होतात; मात्र ही रांग पत्राशेड, तात्पुरते शेड उभारल्याच्या पुढे गोपाळपूर आणि विठ्ठल अभियांत्रिकी महाविद्यालयापर्यंत जाते़ तेथून भाविक दर्शन रांगेत सहभागी होतात़ या भाविकांना श्री विठ्ठलाचे दर्शन सुलभरीत्या व्हावे, यासाठी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने यंदा प्रथमच वॉटरप्रूफ शेडबरोबरच चिखल होऊ नये म्हणून ३ किमी अंतरावर रांगेत मॅट टाकले आहे. तसेच भाविकांना पिण्यासाठी १५ लाख लिटर आर. ओ. च्या पाण्याची सोय केली आहे. शिवाय अखंडपणे उभारून कंटाळा येतो म्हणून ठिकठिकाणी बसण्याचीही सोय केली आहे़ त्यामुळे यंदा वारकºयांना दर्शन रांगेत फारसा त्रास होणार नसल्याचे दिसून येते.

आषाढी वारी सर्वात मोठी असल्याने भाविकांची संख्या १५ लाखांवर जाते. यातील सुमारे ६० टक्के भाविक रांगेत उभे राहून पांडुरंगाचे दर्शन घेतात; मात्र पाऊस, चिखल, ५ ते ६ किलोमीटरच्या रांगेत दिवसरात्र उभा राहणे, यामुळे भाविकांना खूप त्रास सहन करावा लागतो. सावळ्या विठ्ठलाच्या १ सेकंदभर दर्शनासाठी तो हा त्रास आनंदाने सहन करतो़ 

यंदा मात्र मंदिर समितीने भाविकांना रांगेत अधिक सुविधा देण्याचा निर्धार केला आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज दर्शन मंडप, ४ कायमस्वरूपी पत्राशेड आहेत़  याशिवाय यात्रेसाठी मंदिर समिती दरवर्षी तात्पुरते शेड्स उभा करीत असते. या शेडमध्ये पाऊस आला की चिखल होतो आणि भाविकांना पाऊस, चिखलाचा त्रास होतो. यंदा मंदिर समितीने तात्पुरत्या शेडची संख्या वाढवली असून ६ शेड उभारले आहेत. त्यावर पत्रे टाकून हे शेड वॉटरप्रूफ केले आहेत. आता दर्शन रांगेत एकूण १० शेड झाले आहेत. तर पुढे श्री विठ्ठल अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या पुढे दर्शन रांग उभी केली आहे. 


मंदिर समितीकडून प्रथमच सुविधा
या रांगेत चिखल होऊ नये म्हणून यंदा  मंदिर समितीच्या वतीने प्लास्टिकचे मॅट खरेदी केले असून सुमारे ३ किलोमीटर लांबीचे हे मॅट तात्पुरत्या शेडमध्ये टाकण्यात आले आहेत. या मॅटमुळे रांगेत चिखल होणार नाही तसेच भाविकांच्या पायाला मुरुम, कृश खडी टोचणार नाही. पहिल्यांदाच ही सुविधा मंदिर समितीने दिली असून भाविकांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच रांगेत उभारणाºया भाविकांना मंदिर समितीकडून शुद्ध  पिण्याचे पाणी पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याकरिता मंदिर समितीने स्वत: ३.५० लाख लिटर आरओच्या पाण्याची खरेदी केली आहे. तसेच नांदेड येथील सेवाभावी संस्थेने नगरपालिकेच्या बोअरवर आरओ फिल्टर यंत्रणा बसवली असून त्याद्वारे शुद्ध पाणी पुरवले जाणार आहे. श्री विठ्ठल अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या आरओ प्लांट मधूनही रांगेतील भाविकांना पिण्याचे शुद्ध पाणी पुरवण्याचे नियोजन केले आहे.

दर्शन रांगेत असणार २० एलसीडी टीव्ही
- पदस्पर्श दर्शन रांगेत उभे असणाºया भाविकांना श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन व्हावे यासाठी मंदिर समितीच्या वतीने यंदा प्रथमच विविध ठिकाणी २० एलसीडी टीव्हीचे ८ बाय १२ चे स्क्रीन बसविण्यात येणार आहेत़ त्यामुळे दर्शन रांगेतील भाविकांना मंदिरातील श्री विठ्ठल-रुक्मिणीचे लाईव्ह दर्शन होणार आहे़ 

विठ्ठल दर्शन रांगेत सुमारे दीड लाख भाविक एकाचवेळी उभा राहू शकतील, अशी व्यवस्था केली आहे. शिवाय त्यांना पिण्यासाठी शुद्ध पाणी, पायाला क्रश खडी टोचू नये, पाऊस, चिखलापासून संरक्षण व्हावे म्हणून मॅट अंथरले आहेत. त्यामुळे भाविकांनी या सोयी-सुविधांचा लाभ घ्यावा आणि प्रशासनास सहकार्य करावे.
- सचिन ढोले,
कार्यकारी अधिकारी, श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती, पंढरपूर

Web Title: Ashadhi Vari Sohala; 1.5 lakh devotees to be built in the Darshan queue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.