आषाढी वारी विशेष ; तुकोबारायांच्या पालखीतही माऊलींच्या पादुका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 05:11 PM2018-07-20T17:11:06+5:302018-07-20T17:13:06+5:30
शेकडो वर्षांची परंपरा : तुकोबारायांच्या पुत्राने केली पालखी सोहळ्याची सुरुवात
शहाजी फुरडे-पाटील
संत तुकाराम पालखी मार्ग : आषाढी एकादशी सोहळ्यासाठी देहू येथून पंढरीच्या दिशेने वाटचाल करीत असलेल्या संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यामध्ये पहाटे काकडा, विसावा व मुक्कामाच्या ठिकाणी स्थानिक मानकरी यांच्या महापूजा, दोन्ही वेळेचे नैवेद्य, शेजारती असे नित्योपचार पार पडतात. विशेष म्हणजे संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात पालखीमध्ये केवळ संत तुकोबारायांच्याच नव्हे तर संत ज्ञानेश्वर महाराजांच्याही पादुकांचे दर्शन घडते. शेकडो वर्षांपासूनची ही परंपरा आजही कायम आहे.
पालखी सोहळ्याची सुरुवात ही संत तुकाराम महाराजांचे पुत्र तपोनिधी नारायण महाराज यांनी सुरू केली. नारायण महाराज यांना संत ज्ञानेश्वर महाराज यांचा अवतार मानले जाते.
तुकोबांचे सेवाऋण फेडायासाठी।
अवतरला ज्ञानोबा जिजाई पोटी।।
यासाठी अभंगाचे हे प्रमाण देखील आहे.देहूपासून सुरू झालेला संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा पुढे देहू व आळंदी असा एकत्र चालायचा. त्यामध्ये दोन्ही संतांच्या पादुका असायच्या. पुढे कालांतराने हे दोन्ही सोहळे विभक्त झाले. मात्र देहूकरांकडून आजही दोन्ही पादुका एकत्र नेण्याची पं्रथा सुरू आहे.
तुकोबांच्या पालखीत माऊलींच्या मूळ तांब्याच्या पादुका आहेत तर तुकोबांच्या पादुका या चांदीच्या आहेत. माऊलींच्या पादुका आतील बाजूस तर बाहेरच्या बाजूला तुकोबांच्या पादुका आहेत. वारीच्या या वाटचालीत रात्री शेजारतीला दोन्ही पादुका सिंहासनावर ठेवून काढा वगैरे उपचार देऊन पूजा केली जाते. त्यानंतर गोड दूध, शेंगदाणे यांचा प्रसाद दिला जातो. शेजारती सुरू असताना अभंग गात तुकाराम तुकाराम, असा जयघोष अखंडपणे सुरू असतो. या शेजारतीला स्थानिक ग्रामस्थांची मोठी उपस्थिती असते.
पहाटेचा काकडा झाल्याशिवाय तुकोबा झोपेतून उठत नाहीत आणि शेजारती झाल्याशिवाय ते झोपत नाहीत. आणि शेजारती झाल्याशिवाय पहाटे काकडा होत नाही. वारीच्या या मार्गक्रमणात सर्व नियोजन हे चोपदार करतात. तर काकडा आरतीचा मान हा देहू संस्थानचे माजी विश्वस्त विश्वजित मोरे महाराज यांच्याकडे परंपरेने चालत आला आहे. प्रस्थानाचा आणि दुपारचा तुकोबांचा नैवेद्य हा रथाच्या पुढे चालण्याचा मान असलेल्या पाथरुडकर दिंडीकडे असतो. शेजारतीचे सर्व धार्मिक विधी व आरती आदी जबाबदारी ह. भ. प. पुंडलिक मोरे महाराज हे पार पाडतात.
रथाच्या पुढे चालते मानाची पाथरुडकर दिंडी
पाथरुडकर दिंडी ही रथाच्या पुढे चालते. रथाच्या पुढे चालणे हे अवघड काम असते. कारण जलदगतीने चालावे लागते; मात्र ही दिंडी गेल्या शेकडो वर्षांपासून चालत आहे. म्हातारबुवा पाथरुडकर यांनी या दिंडीची स्थापना केली आहे. पाथरुड, तालुका माजलगाव या परिसरातील वारकरी या दिंडीत चालतात. विशेष म्हणजे या दिंडीतील वारकरी हे माजलगाववरून पंढरपूर-आळंदी-देहू व त्यानंतर पुढे देहू ते पंढरपूर असा सुमारे पाचशेपेक्षा जास्त किलोमीटर अंतर पायी चालत येतात. दिंडीत सुमारे ३५० वारकरी आहेत. भगवान बाबा पाथरुडकर हे दिंडीचालक म्हणून काम पाहत आहेत.
पाथरुडकर दिंडीतील वीणेकरी ९७ वर्षांचे
या मानाच्या पाथरुडकर दिंडीत दोन वीणेकरी आहेत. यातील लक्ष्मण दाजीबा शेरकर हे मोगरा, तालुका माजलगाव येथील रहिवासी. त्यांचे आज वय आहे ९७ वर्षे आणि त्यांची वारी आहे ५२ वी. एवढ्या वयातही ते आणि त्यांचे १० ते १२ सहकारी पंढरपूर, देहू व नंतर माजलगाव असे अंतर दोन महिने पायी चालून पूर्ण करतात. वारीत एवढी वर्षे चालता आली, त्याबद्दल ते खूप आनंदी आहेत.