आषाढी वारी विशेष ; पंढरपुरातल्या मूर्ती सातासमुद्रापार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 02:18 PM2018-07-18T14:18:43+5:302018-07-18T14:20:42+5:30
नावीन्यपूर्ण बाजारपेठ : दगडी मूर्तीला भाविकांतून मोठ्या प्रमाणात मागणी
अंबादास वायदंडे
पंढरपूर : ‘चंद्रभागा तीरी, उभा विटेवरी... कर कटेवरी उभा विटेवरी’ असलेल्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी देशासह परदेशातूनही भाविक येतात़ त्यामुळे येथील विविध देवतांच्या मूर्ती परदेशात गेल्याचे मूर्तीकारांनी सांगितले़.
आध्यात्मिकाची काशी मानली जाणाºया पांडुरंगाच्या पंढरी नगरीत आषाढी यात्रेस विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी संपूर्ण देशाच्या कानाकोपºयातून लाखो भाविक येतात. १२ महिने २४ तास हे शहर भाविकांनी गजबजलेले असते. साहजिकच येथील बाजारपेठही नावीन्यपूर्ण आहे. हाताने घडवलेल्या दगडी मूर्तीला भाविकांतून मोठ्या प्रमाणात मागणी आहे़
श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेची रोजच्या रोज पूजा, आरती करण्यासाठी देशातीलच नव्हे तर परदेशातील भाविकसुद्धा पंढरपुरात आल्यानंतर मूर्ती घेऊन जातात़ गावोगावी मूर्तीची प्रतिष्ठापना करून नित्यनियमाने पूजा करतात़
पंढरपुरात दगडापासून मूर्ती घडविण्याचे दहा कारखाने आहेत. या मूर्तीच्या व्यवसायावर २५० ते ३०० कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो़ आषाढी यात्रेत दहा लाख रुपयांच्या आसपास मूर्तींची विक्री होते. काळापाषाण, शाळीग्राम पाषाण, मटकना मार्बल, काळा मार्बल व खाणीतील दगडापासून ही मूर्ती तयार केली जाते़ हे दगड कर्नाटक, राजस्थान व ग्रामीण भागातून मागवले जातात.
पंढरपुरात संजय मंडवाले यांचे कोणार्क शिल्प हे मूर्तीचे दुकान आहे.
आमचा हा पारंपरिक व्यवसाय असून या कारखान्यातून सर्व देवदेवतांच्या, संत, महाराज मंडळींच्या मूर्ती व महामानवाचे पुतळे दगडापासून हाताने घडवून तयार केले जातात. आमच्याकडील मूर्ती पाकिस्तानात गोरक्षनाथाची, अटलांटिकमध्ये गजानन महाराजांची, पश्चिम जर्मनीत श्री कृष्णाची, अमेरिकेत तुळजाभवानीची व चेन्नईमध्ये विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती विकली गेली आहे़ मूर्तीची किंमत त्याच्या आकारावरून ठरविली जाते़
आता आषाढी यात्रेसाठी आमच्याकडे लहान-मोठ्या २५० मूर्ती तयार आहेत. सर्वाधिक पसंती ही विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्तीला आहे़ दगडाला वेगवेगळा आकार देऊन पॉलिश रंग देऊन आकर्षक मूर्ती तयार केली जाते़
शासनाने दहा फुटाच्या खाली जमिनीचे उत्खनन करू नये, असा नियम काढल्याने मूर्ती तयार करण्यासाठी लागणाºया दगडाचा तुटवडा निर्माण झाला आहे. पुढील काळात मूर्तीचे दगड न मिळाल्यास हा व्यवसाय अडचणीत येण्याची शक्यता आहे. या व्यवसायावर अनेक कारागिरांचा संसार चालतो़ शहरातील अनेक कारखाने बंद पडल्याने कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे़
- राजेंद्रसिंह मंडवाले, मूर्तीकार, पंढरपूर.