आषाढी वारी ; उजनीतून भीमा नदीत पाणी सोडल, तीन हजारांचा विसर्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2018 04:03 PM2018-07-15T16:03:04+5:302018-07-15T16:04:29+5:30
भीमानगर : पंढरपूरच्या आषाढी वारीनिमित्त उजनीतून भीमा नदीत दोन हजार क्युसेक्सने पाणी सोडण्यात आले. यात टप्प्याटप्प्याने त्यात वाढ करून तीन हजारांचा विसर्ग करण्यात आला.
तुकाराम महाराजांची पालखी दोन दिवसाने म्हणजे सोमवारी भीमा नदीपासून अवघ्या ७ किलोमीटर अंतरावर पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथे मुक्कामी येणार आहे व पुढे सर्व छोट्या-मोठ्या पालख्यांचे येत्या चार ते पाच दिवसात सोलापूर जिल्ह्यात आगमन होणार आहे. १२ ते १५ लाख भाविक पंढरपूरला येणार आहेत. त्यामुळे भाविकांना पाण्याची सोय व्हावी व पंढरपूर येथे चंद्रभागेत पाणी दोन-तीन दिवसांत पोहोचणे गरजेचे आहे.
२३ जुलैला पंढरपूरच्या यात्रेला येणाºया भाविकांची संख्या आत्तापासूनच वाढायला लागली आहे. त्यामुळे प्रशासनाने गरज ओळखून पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातच पुणे जिल्ह्यातील दौंड येथून उजनी धरणात १० हजार ९३९ क्युसेक्सने पाणी येत असून दौंड येथून येणारा विसर्ग असाच अजून पाच दिवस राहिला, तर धरण मायनसमधून बाहेर निघणार आहे.
उजनीची सद्यस्थिती
- - एकूण पाणी पातळी ५९०.४२५ द. ल. घ. मी.
- - एकूण पाणीसाठा १६८६.३८ द. ल. घ. मी.
- - उपयुक्त पाणीसाठा - ११६.१३
- - टक्केवारी वजा ७.६५ टक्के
- - दौंड येथून विसर्ग १० हजार ९३९ क्युसेक्स