आषाढी वारी २०१८ - विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात यापुढे दर्शनबारीतूनच प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2018 12:26 PM2018-07-05T12:26:34+5:302018-07-05T12:29:17+5:30
अपर जिल्हादंडाधिकारी संजय तेली आदेश
सोलापूर : पंढरपुरात होणाºया आषाढी वारी सोहळ्यादरम्यान विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील प्रवेशासाठी मंदिर समितीने दर्शनासाठी केलेल्या दर्शन बारीतूनच प्रवेश देण्यात येईल, असे आदेश प्रशासनाने काढले आहेत. १३ ते २७ जुलै या कालावधीत पंढरीतील आषाढी सोहळा होत आहे. यासाठी पंढरपुरात येणाºया वारकºयांची संख्या लक्षात घेता सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेतल्याचे अपर जिल्हादंडाधिकारी संजय तेली यांनी म्हटले आहे.
मुंबई पोलीस कायदा कलम ३७ (४) नुसार विठ्ठल-रुक्मिणी मंदिर सार्वजनिक पूजा व इतर धार्मिक विधीच्या वेळा सोडून भाविकांना दर्शनासाठी खुले राहणार आहे. मंदिर समितीने केलेल्या दर्शन बारीतूनच भाविकांना दर्शनासाठी सोडले जाईल. अन्य कोणत्याही दरवाजातून सोडण्यात येणार नाही.
दर्शनासाठी महिलांसाठी वेगळी रांग नाही. तर उत्तर दरवाजातून व्हीआयपी गेटवरुन फक्त समिती निमंत्रित पाहुणे तसेच मंदिर समितीने परवानगी दिलेल्या निमंत्रित व्यक्तींनाच मंदिरात प्रवेश दिला जाईल. भाविकांनी मुखदर्शनानंतर उत्तर दरवाजातूनच बाहेर पडावे. तसेच पश्चिम दरवाजासमोरील मोकळ्या जागेतील गर्दीवरही नियंत्रण राखले जाणार आहे. मंदिराच्या सोळखांबीजवळील उत्तरेकडील दरवाजानेही भाविकांना मनाई करण्यात आली आहे.