Ashadhi Wari 2024; प्रत्येक वारकऱ्यास पाण्याची बॉटल अन् मँगो ज्युस मोफत मिळणार
By Appasaheb.patil | Published: July 15, 2024 01:46 PM2024-07-15T13:46:14+5:302024-07-15T13:46:28+5:30
वारीत सहभागी होत असलेल्या प्रत्येक वारकऱ्यास पाण्याची बॉटल व मँगो ज्युसही मोफत देण्यात येत आहे.
आप्पासाहेब पाटील, सोलापूर : पंढरपुरात आषाढी एकादशीचा मुख्य सोहळा बुधवार १७ जुलै २०२४ रोजी साजरा होत आहे. या सोहळ्यासाठी लाखो भाविक पंढरपूरमध्ये दाखल होऊ लागले आहेत. वारीसाठी येणाऱ्या भाविकांसाठी मंदिर समिती व प्रशासनाच्या वतीने दर्शन रांगेत मॅट, स्वच्छ पेयजल, आरोग्य, शौचालये आदी सेवासुविधा तसेच, महिला भाविकांसाठी विशेष सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. वारीत सहभागी होत असलेल्या प्रत्येक वारकऱ्यास पाण्याची बॉटल व मँगो ज्युसही मोफत देण्यात येत आहे.
आषाढी वारीसाठी पंढरपुरात १५ लाखांपेक्षा अधिक भाविक येण्याची शक्यता गृहित धरून प्रशासनाकडून नियोजन करण्यात आले आहे. सध्या मानाच्या पालख्या पंढरपूर समीप येत आहेत. आज सोमवारी श्री संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे उभे रिंगण सोहळा बाजीराव विहिरीजवळ होणार आहे. तर ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे उभे व गोल रिंगण सोहळा बाजीराव विहिरीवर होणार आहे. पालखी सोहळ्यासोबत पाच लाखांपेक्षा अधिक भाविक पायी वारी करीत आहेत. तर एकनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्यातील पादुकांना भीमा नदीत स्नान घालण्यात येणार आहे. आज मानाच्या पालख्यांचा मुक्काम वाखरी येथील पालखी तळावर होणार आहे.
सध्या पंढरपुरात आषाढी वारीच्या निमित्तानं भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहेत. सर्वत्र भजन, किर्तन अन् माऊली...माऊलीचा गजर ऐकावयास येत आहे. राज्यभरातून असंख्य पालख्या पंढरपुरात दाखल झाल्या आहेत. वाळवंट व ६५ एकर परिसरात पालख्यांसाठी विशेष सोय करण्यात आली आहे. एकूणच वारी सुखकर, समाधानाने पूर्ण व्हावी यासाठी सोलापूर जिल्हा प्रशासन पूर्ण परिश्रम घेत आहे.