तुका म्हणे काहीं न मागे आणीक। तुझे पायीं सुख सर्व आहे।।; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली शासकीय महापूजा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2024 03:30 AM2024-07-17T03:30:59+5:302024-07-17T03:33:19+5:30
आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठ्ठल नामाच्या जयघोषाने विठुरायाची नगरी दुमदुमली आहे. पंढरपूरमध्ये आषाढी एकादशीनिमित्त मोठी गर्दी झाली आहे.
आप्पासाहेब पाटील
पंढरपूर (सोलापूर) : पंढरपूरमध्ये आज मोठ्या भक्तिमय वातावरणामध्ये आषाढी एकादशीच्या सोहळा संपन्न होत आहे. मुख्यमंत्र्याबरोबरच नाशिक जिल्ह्यातील सटाणा येथील बाळू आणि आशाबाई अहिरे दांपत्य यांना यंदा मानाचे वारकरी म्हणून महापूजेचा सन्मान मिळाला.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहपत्नीक विठ्ठलाची शासकीय महापूजा केली. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या परिवारातील इतर सदस्यही उपस्थित होते.
आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठ्ठल नामाच्या जयघोषाने विठुरायाची नगरी दुमदुमली आहे. पंढरपूरमध्ये आषाढी एकादशीनिमित्त मोठी गर्दी झाली आहे. बारा ते पंधरा लाख भाविक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तसेच परराज्यातूनही विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरमध्ये दाखल झाले आहेत. आषाढी एकादशी निमित्त भीमा नदीमध्ये पाणी सोडल्याने चंद्रभागेमध्ये स्नान करून भाविक नामदेव पायरीचे दर्शन घेऊन प्रदक्षिणा पूर्ण करत आहेत.
आषाढी वारीनिमित्त पंढरपुरात दाखल झालेल्या सर्व वारकऱ्यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वागत केले, तसेच त्यांना शुभेच्छा दिल्या. सलग दुसऱ्या वर्षी विठुरायाची शासकीय पुजा करण्याचं भाग्य मला मिळाल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. लाखो वारकरी आषाढी वारीसाठी पंढरपुरात येतात. संपूर्ण पंढरपूर आज वारकरीमय झालं आहे. सगळं वातावरण मंगलमय झालं आहे. शासकीय महापूजेवेळी राज्यातील अनेक मंत्री, वरिष्ठ अधिकारी व स्थानिक प्रशासनातील मुख्य अधिकारी वर्ग उपस्थित होता. लाखो वारकरी विठ्ठलाचे नामस्मरण करीत आहेत. पंढरपूरच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात माऊली माऊली व हरिनामाचा गजर होत आहे. सर्व प्रशासनाने चांगले नियोजन केल्याचे देखील मुख्यमंत्री म्हणाले. सर्वांनी सहकार्य केल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.