आषाढी वारी; जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल.. नामघोषाने आसमंत दुमदुमला
By Appasaheb.patil | Published: July 11, 2024 03:24 PM2024-07-11T15:24:45+5:302024-07-11T15:25:29+5:30
हरी नामाच्या गजरात संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे सोलापूर जिल्ह्यात आगमन झाले.
सोलापूर : टाळी वाजवावी, गुढी उभी रहावी, वाट ती चालावी पंढरीची या संत वचनानुसार टाळ मृदंगाचा गजर आणि मुखाने जय हरी विठ्ठल... जय हरी विठ्ठल, ज्ञानोबा... तुकाराम चा जयघोष करीत वारकरी पालखी सोहळ्यात तल्लीन झाले होते. प्रत्येक वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर विठ्ठलाच्या दर्शनाची आस दिसत होती. विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीने वारकरी पंढरीचे अंतर एक एक पाऊल जवळ करीत होता.
दरम्यान, हरी नामाच्या गजरात संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे सोलापूर जिल्ह्यात आगमन झाले. धर्मपुरी येथे पालखी आगमनापूर्वी सोलापूर जिल्हा परिषदेच्या वतीने विविध जनजागृतीपर कार्यक्रम सादर करण्यात आहे. यामध्ये आरोग्य शिक्षण, लेक लाडकी, पर्यावरण रक्षण, प्रदूषण मुक्ती, स्वच्छ्ता या विषयांचा प्रामुख्याने समावेश होता. आषाढी शुद्ध एकादशी सोहळा १७ जुलै २०२४ रोजी होणार असून, या सोहळ्यासाठी श्री ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम पालखी सोहळ्याबरोबर तसेच अन्य संताच्या पालखी सोहळे पंढरपूरच्या जवळपास आल्या आहेत.
१२ लाखांपेक्षा अधिक वारकरी भाविक पंढरपुरात येण्याची शक्यता गृहित धरून जिल्हा प्रशासनाकडून तयारी करण्यात आली आहे. आषाढी वारी कालावधीत वारकरी भाविकांना पालखी मार्ग, पालखीतळ, विसावा आणि रिंगण सोहळ्याच्या ठिकाणी पाणी, आरोग्य, सुरक्षा, स्वच्छतेच्या पुरेशा सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य देण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे.