आषाढी यात्रा तयारी; विठ्ठल मंदिर परिसरात अतिक्रमण कारवाई; रस्त्यांवरील दुकानांवर जेसीबीचा हातोडा
By Appasaheb.patil | Published: July 4, 2024 01:15 PM2024-07-04T13:15:01+5:302024-07-04T13:15:11+5:30
आषाढी शुद्ध एकादशी सोहळा १७ जुलै २०२४ रोजी होणार आहे. आषाढी यात्रा कालावधीत सुमारे १५ लाखांहून अधिक भाविक येण्याची शक्यता गृहित धरून प्रशासनाकडून तयारी करण्यात येत आहे.
आप्पासाहेब पाटील
सोलापूर : आषाढी यात्रेच्या तयारीला वेग आला आहे. मंदिर परिसरातील अतिक्रमण काढण्याची कारवाई गुरूवार सकाळपासून वेगाने सुरू झाली आहे. या कारवाईनं मंदिर परिसरातील रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
आषाढी शुद्ध एकादशी सोहळा १७ जुलै २०२४ रोजी होणार आहे. आषाढी यात्रा कालावधीत सुमारे १५ लाखांहून अधिक भाविक येण्याची शक्यता गृहित धरून प्रशासनाकडून तयारी करण्यात येत आहे. पंढरपूरात येणाऱ्या प्रत्येक भाविकाला आषाढी यात्रा कालावधीत प्रशासनाकडून आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.
नुकतेच जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पत्राशेड दर्शन रांग, वाळंवट, ६५ एकर, भीमा बसस्थानक तसेच पालखी मार्ग व तळांची पहाणी केली. याचवेळी अतिक्रमण काढण्याच्या सूचना केल्या होत्या. या सुचनेनुसार पंढरपूर नगरपालिकेने गुरूवारी मोहिम राबविली. मंदिर परिसरातील दुकाने, गाळे, छोटी मोठी दुकानांनी रस्ता व्यापला होता, त्यामुळे वाहतूकीला मोठा अडथळा निर्माण होत होता. आता अतिक्रमण विभागाच्या कारवाईनं रस्ता मोकळा दिसून येत आहे.