अशीही जिद्द; आई-वडिलांसाठी लढणाऱ...होमगार्डचा पीएसआय होणार...
By appasaheb.patil | Published: July 20, 2020 12:00 PM2020-07-20T12:00:14+5:302020-07-20T12:04:16+5:30
लॉकडाऊन बंदोबस्तावरील होमगार्डचा रस्त्यांवरही अभ्यास; तो करतोय एमपीएससी परीक्षेचा अभ्यास
सुजल पाटील
सोलापूर : अपंग वडील...दवाखान्यात सेविका म्हणून कष्ट करणारी आई़़़या दोघांचे परिश्रम पाहून मनात जिद्द निर्माण झाली़ सध्या होमगार्ड म्हणून सेवा करीत असलो तरी पीएसआय होण्याचे स्वप्न उराशी बाळगून एमपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली़ आता मागे हटणार नाही़़़ अभ्यासातील सातत्य, कठोर परिश्रम, चिकाटी मनी बाळगून हे स्वप्न सत्यात उतरविण्याचा चंग बांधला आहे़ याचे नाव आहे निरंजन ज्ञानदेव गायकवाड..
लष्कर भागातील निरंजन याची घरची परिस्थिती अत्यंत नाजूक...साधी राहणीमान, प्रेमळ स्वभाव...समोरच्याचा सन्मान करणे हेच निरंजनचे खास वैशिष्टे. आपल्या पुढच्या स्वप्नातील बद्दल निरंजन म्हणाला की, मी पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण वसंतराव नाईक हायस्कुल येथे पूर्ण केल्यानंतर अकरावी ते पदवीपर्यंत शिक्षण संगमेश्वर महाविद्यालयात पूर्ण केले़ पोलिस होण्याचे स्वप्न लहानपणापासून होते त्यामुळे तशी तयारीही करीत होतो़ सहा महिन्यांपूर्वी होमगार्ड भरतीच्या पहिल्या प्रयत्नात यशस्वी झालो़ त्यानंतर ट्रेनिंग पूर्ण करून सोलापूर शहर पोलिस हद्दीतंर्गत असलेल्या विविध भागात बंदोबस्तात काम केले़ सध्या दहा दिवसाच्या संचारबंदीसाठी पार्क चौकात डयुटी लावण्यात आल्याचेही निरंजन याने सांगितले.
------------
कंटेंन्मेंट झोन भागातही केला बंदोबस्त....
मागील सहा महिन्यांपासून कोरोना महामारीच्या काळात सदर बझार पोलिस ठाण्यातंर्गत विविध ठिकाणी बंदोबस्तावर काम केले. दरम्यान, संचारबंदी, लॉकडाऊन, कंटेन्मेंट झोन, वाहतूक शाखांतंर्गत असलेला बंदोबस्त आदी ठिकाणी सेवा बजाविली़ दिवसभर सेवा बजावून रात्री घरी आल्यानंतर अभ्यासातील सातत्य मात्र सोडले नसल्याचेही निरंजन यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले़