वडिलांनी सरपंचपदाचा राजीनामा द्यावा म्हणून पुत्रावर प्राणघातक हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:22 AM2021-04-22T04:22:10+5:302021-04-22T04:22:10+5:30
ही मारहाणीची घटना १९ एप्रिल रोजी रात्री ताडसौंदणे येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर घडली. याबाबत जखमी विठ्ठल सुतार (वय ...
ही मारहाणीची घटना १९ एप्रिल रोजी रात्री ताडसौंदणे येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर घडली. याबाबत जखमी विठ्ठल सुतार (वय ३८) यांनी तालुका पोलिसात तक्रार दिली. त्यावरुन उपसरपंच राहुल तानाजी पाटील व गौरव गंगाधर शिंदे यांच्या विरुद्ध मंगळवारी भादंवि ३०७, १०९, ५०४ अन्वये गुन्हा नोंदला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की जखमींचे वडील दोन वर्षापूर्वी बिनविरोध निवडून आल्यानंतर गावातील विकास कामासाठी त्यांना मुलगा विठ्ठल हा मदत करत होता. यामुळे उपसरपंच राहुल पाटील नेहमीच चिडून होता. त्यामुळे राहुल पाटील याने त्याचे नातेवाईक गौरव शिंदे याला सांगून जखमीला शिवीगाळ, दमदाटी करुन ‘तुझ्या वडिलांना पदाचा राजीनामा देण्यास सांग’ असे म्हणत होता.
घटनेच्या दिवशी जखमी ग्रामपंचायत कार्यालयासमोर थांबला होता. त्यांने वडिलांना राजीनामा देण्यास सांग नाहीतर संध्याकाळपर्यंत तुला जिवंत सोडणार नाही असे म्हणताच राहुल पाटील याच्या सांगण्यावरून गौरव शिंदे यांनी ठार मारण्याच्या उद्देशाने लोखंडी गज डोक्यात मारून जखमी केले. खाली पडताच दगडाने मारहाण केली. बेशुद्धावस्थेत गावातील लोकांनी त्याला बार्शीच्या खासगी दवाखान्यात दाखल केले. पुढील तपास पोलीस करत आहेत.
----