सोलापुरातील इंदिरा गांधी स्टेडियमवर महाराष्ट्र अन् सौराष्ट्रच्या फिरकीपट्टूंचा बोलबाला
By Appasaheb.patil | Published: February 3, 2024 07:32 PM2024-02-03T19:32:18+5:302024-02-03T19:32:32+5:30
सामन्यात दोन्ही संघाचे पारडे जड, अंकित बावणेच्या स्वरूपात संघाला दुसरा धक्का लागला वैयक्तिक २५ धावांवर पार्थ भूट च्या षटकात पारेख मंकड द्वारे झेलबाद झाला.
सोलापूर : येथील इंदिरा गांधी स्टेडियमवर सुरू असलेल्या रणजी सामन्यात दोन्ही संघातील फिरकीपटूंनी दिवस गाजविला. सौराष्ट्र संघाने महाराष्ट्र संघापुढे २०८ धावांचे लक्ष्य ठेवले असून आज रविवारी सायंकाळपर्यंत निकाल अपेक्षित आहे.
दरम्यान, दुसऱ्या दिवशी महाराष्ट्र संघाचा २९ षटकात ७ गडी बाद ११६ धावावरून पुढे चालू झाला असता, पहिल्या सत्रात खेळाची सुरुवात तरणजीतसिंग डील्लन आणि अझीम काझी यांनी केले परंतु दुसऱ्या दिवशीच्या ६ व्या षटकातच महाराष्ट्र संघाचा ८ वा गडी बाद झाला.अझीम काझी युवरासिंग दोडियाचा शिकार बनला. त्यानंतर तरणजीतसिंग डील्लन याने २१ धावा केल्या असता, पार्थ भुट द्वारे पायचीत झाला. हितेश वाळुंज याने १३ धावा केल्या. महाराष्ट्र संघ एकूण ४५ षटकात १५९ धावांवर गारद झाला . सौराष्ट्र संघाला पहिल्या डावात ४३ धावांची आघाडी मिळाली.
सौराष्ट्र संघाच्या दुसऱ्या डावाची सुरुवात खूप निराशाजनक झाली. पहिल्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवरच प्रदिप दाढे याने हार्विक देसाई शून्य वरती यश्टीरक्षक विशांत मोरे द्वारे झेलबाद करत तंबूत परत पाठवले. त्यापाठोपाठ केविन जिवराजानी चौथ्या षटकात हितेश वाळुंजने प्रदिप दाढे द्वारे झेलबाद करत परत पाठवले. त्यानंतर सौराष्ट्र संघाची अवघ्या १० षटकात ५ बाद १६ धावा अशी अवस्था झाली. चेतेश्वर पुजाराने पुन्हा एकदा प्रेक्षकांना निराश केले. विश्वराजसिंह जडेजा आणि पारेख मंकड यांनी पुन्हा एकदा सौराष्ट्र संघाचा डाव सावरत ६ व्या विकेटसाठी ४९ धावांची भागीदारी केली. परंतु विश्वराजसिंह जडेजा वैयक्तिक ३९ धावांवर खेळत असताना हितेश वाळुंज याचा चेंडू थेट स्टंपवर जावून आदळला. त्यापाठोपाठ धर्मेंद्र जडेजा सुद्धा लगेच २१ धावांवर शिकार झाला. त्यानंतर मात्र जयदेव उनाडकट आणि चिराग जानी यांनी महाराष्ट्र संघाच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेत ९ विकेटसाठी ९३ धावांची भागीदारी केली. जयदेव उनाडकट याने वैयक्तिक ४५ तर चिराग जानी याने वैयक्तिक ४३ धावा करत संघाला धावसंख्या उभारण्यास योगदान दिले. सौराष्ट्र संघाचा दुसरा डाव ४३.२ षटकात १६४ धावांवर संपुष्टात आला. त्याला अझीम काझी आणि प्रदीप दाढे यांनी प्रत्येकी एक बळी मिळवत उत्तम साथ दिली.
महाराष्ट्र संघाची दुसऱ्या डावात ओम भोसले व कौशल तांबे यांनी डावाची सुरुवात केली. परंतु कौशल तांबे वैयक्तिक १६ धावांवर युवराजसिंग दोडियाच्या चेंडूवर त्रिफळाचित झाला. त्यानंतर आलेल्या अंकित बावणे व सलामीचा फलंदाज ओम भोसले यांनी दुसऱ्या विकेट साठी ३५ धावांची भागीदारी केली. अंकित बावणेच्या स्वरूपात संघाला दुसरा धक्का लागला वैयक्तिक २५ धावांवर पार्थ भूट च्या षटकात पारेख मंकड द्वारे झेलबाद झाला. त्यापाठोपाठ ओम भोसले देखील १६ धावांवर तंबूत परतला.त्याला सुद्धा पार्थ भूट ने पारेख मंकड द्वारे झेलबाद केले. त्यानंतर विषांत मोरे व अझीम काझी यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न करत चौथ्या गड्यासाठी २३ धावांची भागीदारी केली, मात्र १९ व्या षटकात अझीम काझीने आपली विकेट गमावली. त्याला युवराजसिंग दोडियाने पायचीत केले. दुसऱ्या दिवसाआखेर महाराष्ट्र संघाच्या दुसऱ्या डावात २७ षटकात ५ गडी बाद १०४ अशी धावसंख्या झाली आहे. सौराष्ट्र संघाकडून पार्थ भुट याने २ बळी, युवराजसिंग दोडीया २ बळी तर जयदेव उनाडकट यांना एक बळी घेण्यात यश मिळवता आले. अजूनही महाराष्ट्र संघाला विजयासाठी १०४ धावांची गरज आहे .