सोलापुरात अट्टल सोनसाखळी चोराला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2017 02:59 PM2017-09-22T14:59:23+5:302017-09-22T14:59:59+5:30
केरळ व महाराष्ट्रासह देशातील अन्य काही राज्यात सोन साखळी चोरणाऱ्या अट्टल चोरटयास विजापूर नाका पोलीस ठाण्यांच्या डी.बी. पथकाने अटक केली.
सोलापूर : केरळ व महाराष्ट्रासह देशातील अन्य काही राज्यात सोन साखळी चोरणाऱ्या अट्टल चोरटयास विजापूर नाका पोलीस ठाण्यांच्या डी.बी. पथकाने अटक केली. या कामगिरी बद्दल पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांनी विशेष बक्षीस जाहीर केल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले. कंबर नूर अली इरानी रहिम मिर्झा (वय ३०,रा.श्रीरामपूर) असे अटक केलेल्या सोनसाखळी चोरट्याचे नाव आहे. त्याचा साथीदार आमीर पठाण (रा.श्रीरामपूर) हा फरार आहे.
विजापूर नाका पोलीस ठाण्यांच्या डि.बी. पथकाला आरोपी हा श्रीरामपूर येथे असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक अरुण लिगाडे यांच्या पथकाने सापळा रचून आरोपी कंबर याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने विजापूर नाका पोलीस ठाण्यांच्या हद्दीत चार ठिकाणी सोनसाखळी पळविल्याचे पोलीसांना सांगितले. तसेच आरोपीविरुध्द पुणे, नाशिक, कोल्हापूर व केरळ येथे चैन स्नॅचिंगचे गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी आरोपीकडून दागिने व एक दुचाकी असा एकुण २ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याच प्रकरणात पोलिसांनी एका सराफस अटक केली. त्या दोघांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्या दोघांची पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.
पोलीस आयुक्त महादेव तांबडे, पोलीस उपआयुक्त (परिमंडळ)अपर्णा गिते यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सावंत ,दुय्यम पोलीस निरीक्षक फुगे,डी.बी. पथकाने पोलीस उपनिरीक्षक अरुण लिगाडे,बायस, भालशंकर, निकम, माळी आदींनी ही कामगिरी केली.