अटलजींच्या अस्थींचे आज पंढरपूरातील चंद्रभागेत विसर्जन; सोलापूरात झाले आगमन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2018 11:05 AM2018-08-23T11:05:14+5:302018-08-23T11:06:53+5:30
अस्थिकलशाचे सोलापूर शहरात सकाळी सात वाजण्याच्या सुमारास आगमन झाले़
पंढरपूर : माजी पंतप्रधान, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचा अस्थिकलश पालकमंत्री विजयकुमार देशमुख हे गुरुवारी सकाळी सोलापुरात आणणार आहेत. दुपारपर्यंत सोलापूरकरांना या अस्थीकलशाचे दर्शन झाल्यानंतर हा अस्थीकलश दुपारी १ वाजण्याच्या सुमारास पंढरपुरातील जिजामाता उद्यान येथील हुतात्मा स्मारक येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार असल्याची माहिती भाजपाचे शहराध्यक्ष संजय वाईकर यांनी दिली.
या अस्थिकलशाचे सोलापूर शहरात सकाळी सात वाजण्याच्या सुमारास आगमन झाले़ यावेळी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, उपमहापौर शशिकला बत्तुल यांच्यासह आदी भाजप, शिवसेना व सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते़ या कलशाचे सोलापूर शहरातील प्रमुख मार्गावरून मिरवणुक होऊन राजवाडे चौक येथील भाजप पक्ष कार्यालयासमोर लोकांना दर्शनासाठी अस्थिकलश ठेवण्यात आले आहे़ दुपारी बाराच्या सुमारास या कलशाचे पंढरपूरकडे मार्गस्थ होईल
पंढरपूर पंचक्रोशीतील अटलजी प्रेमींनी या अस्थीकलशाच्या दर्शनासाठी शिवाजी चौकामधील जिजामाता उद्यान येथील हुतात्मा स्मारक येथे दुपारी १ ते ४ या वेळेत अस्थीकलशाचे दर्शन घ्यावे. दुपारी ४ वा. हा अस्थीकलश हुतात्मा स्मारक येथून शिवाजी चौक, चौफाळा, पश्चिमद्वार, महाद्वार पुन्हा पश्चिमद्वारमार्गे चौफाळा चौकात आणण्यात येईल. त्यानंतर चौफाळामार्गे गांधी रोड, नाथ चौक, भजनदास चौक, मुक्ताबाई मठ, कुंभार घाटामार्गे हा अस्थीकलश महाद्वार चौकात आणण्यात येईल.
महाद्वार चौकातून महाद्वार घाटावरून भक्त पुंडलिकाच्या समोरील चौथºयावर हा अस्थीकलश ठेवण्यात येईल. याठिकाणी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते ब्रह्मवृंदांच्या हस्ते विधिवत पूजन करून हा अस्थीकलश चंद्रभागेमध्ये विसर्जित करण्यात येईल़ यावेळी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, भाजपाचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांच्यासह भाजपाचे अनेक ज्येष्ठ नेते व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.