एटीएम कार्डची अदला-बदल, ९० हजारांचा घातला गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:23 AM2021-04-01T04:23:47+5:302021-04-01T04:23:47+5:30
टेंभुर्णी येथील विलास मच्छिंद्र यादव (४०) हे २० मार्च रोजी दुपारी २ ते ३ वाजेच्या सुमारास त्याच्या बँक खात्यात ...
टेंभुर्णी येथील विलास मच्छिंद्र यादव (४०) हे २० मार्च रोजी दुपारी २ ते ३ वाजेच्या सुमारास त्याच्या बँक खात्यात जमा झालेली ऊस बिलाची रक्कम काढण्यासाठी बँक ऑफ इंडियाच्या जुन्या बसस्टॅण्डजवळील एटीएमवर गेले होते. तेथे त्यांनी रक्कम काढण्यासाठी एटीएम मशीनमध्ये कार्ड टाकले असता रक्कम निघाली नाही. तेव्हा तेथे अनोळखी काहीजण उभे होते. तेवढ्यात कुणीतरी त्यांना सुटे पैसे मागितले. नंतर यादव हे एटीएम कार्ड मागील पँटच्या खिशात ठेवून आयडीबीआय बँकेच्या एटीएम केंद्रात गेले. तेथे जाऊन त्यांनी एटीएम कार्ड मशीनमध्ये घातले असता तेथे ही रक्कम निघाली नाही. तसेच काहीतरी इंग्रजीत मेसेज आला, तो त्यांना समजला नाही. रक्कम निघाली नसल्याने पुन्हा त्यांनी कार्ड पँटच्या मागील खिशात ठेवले. त्यावेळीही तेथे अनोळखी काहीजण उभे होते.
ते रक्कम न निघाल्याने व पैशाची अत्यंत गरज असल्याने स्टेट बँकेच्या ग्राहक सेवा केंद्रात गेले. तेथे त्यांनी ग्राहक केंद्रातील सुहास जगताप यास दोन हजार रुपये काढण्यासाठी त्यांच्याकडे एटीएम कार्ड दिले. कार्ड मशीनमध्ये टाकले असता त्यावर द्रौपदी बंडू पोटले असे नाव लिहिलेले व कार्डवर पुसट नंबर दिसत होता. यामुळे बँकेत नजर चुकवून अज्ञाताने कार्डची आदला-बदल करून फसवणूक केल्याचे समोर आले.
यानंतर जगताप व यादव हे दोघे स्टेट बँकेत गेले व त्यांनी मॅनेजरला घडला प्रकार सांगितला. त्या कार्डवरून काही वेळेपूर्वी सरडेवाडी (ता. इंदापूर) येथील गणेश पेट्रोलपंप येथून ५० हजार व तेथील एटीएममधून १९ हजार रुपये, तसेच इंदापूर येथील ग्राहक केंद्रातून २० हजार रुपये, असे एकूण ८९ हजार रुपये काढल्याचे निष्पन्न झाले. यावेळी यादव यांच्या विनंतीनुसार बँक मॅनेजर यांनी ते एटीएम कार्ड बंद केले. विलास यादव यांच्या फिर्यादीवरून या घटनेप्रकरणी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात २८ मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक तपास पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे करीत आहेत.