भरकटलेल्या रानगव्याच्या घुसखोरीने ग्रामीण भागात भितीचे वातावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:25 AM2021-02-24T04:25:01+5:302021-02-24T04:25:01+5:30
चांदोली अभयारण्यातून भरकटलेल्या जंगली रानगव्याचे सोमवार सायं. ५ च्या सुमारास अचानक कमलापूर (ता. सांगोला) येथे अनुसेमळ्यात विनायक अनुसे यांच्या ...
चांदोली अभयारण्यातून भरकटलेल्या जंगली रानगव्याचे सोमवार सायं. ५ च्या सुमारास अचानक कमलापूर (ता. सांगोला) येथे अनुसेमळ्यात विनायक अनुसे यांच्या मक्याच्या पिकात दर्शन झाले. त्यानंतर त्यांच्यासह ग्रामस्थांनी त्या भल्या मोठ्या रानगव्याला हुसकावून लावताना त्यांने म्हशीला धडक दिल्याने खरचटले होते. तेथून त्या रानगव्यांनी गोडसेवाडी, वासुद येथे रात्री पलायन केले.
वासुद परिसरात रानगव्याचे दर्शन होताच ग्रामस्थांनी वन विभागाशी संपर्क साधला. सांगोला येथील वन विभागाचे वनरक्षक धनंजय देवकर, सहा. वनपाल बी. जे. हाके, वनपाल खंडेभराट, वाहन चालक स्वप्नील दौंड यांनी तत्काळ वासुद येथे धाव घेतली. मात्र ग्रामस्थांच्या भीतीमुळे तो अंधारातून पिकात पळून गेला.
सांगोला येथील वन विभागाच्या शासकीय वाहनावरील स्पीकरद्वारे सदर जंगली रान गव्याला कोणीही त्रास देऊ नका, हुसकावू नका किंवा मारहाण न करता सांगोला येथील वन विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन यांनी केले होते.
रानगव्याच्या पाळतीवर २० कर्मचारी
सदर भरकटलेल्या जंगली रानगव्यास त्याच्या चांदोली येथील अभयारण्यात हुसकावून माघारी परतवण्यासाठी सांगोला वन विभागातील वनरक्षक, वनपाल वनमजूर ,संरक्षक वन मजूर असे २० कर्मचारी त्याच्या पाळतीवर आहेत. मात्र दिवसभर त्याचा ठावठीकाणा मिळून आला नाही. त्याला पुढे जाऊ न देता माघारी परतण्यासाठी मेडशिंगी, आलेगाव, वाढेगाव, कडलास परिसरात वन विभागाचे १० कर्मचारी लक्ष ठेवून आहेत, असे वनरक्षक धनंजय देवकर यांनी सांगितले.
कोट :::::::::::::::::::
जंगली रान गवा जोपर्यंत चिडत नाही, तोपर्यंत तो कोणालाही त्रास देत नाही. उलट माणसाला भिऊन असतो. सदरचा रानगवा कोणाला दिसून आल्यास त्या परिसरात त्याच्या पायाचे ठसे घेऊन खात्री केली जाईल. अफवांवर विश्वास ठेवू नका. लवकरच त्याला हुसकावून परत पाठवू.
- विजय भाटे,
वनपरिक्षेत्र अधिकारी, सांगोला