अल्पवयीन मुलींवर अत्याचार; दोघांना चार वर्षांची शिक्षा, सोलापूर सत्र न्यायालयाचा निकाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2018 03:09 PM2018-12-18T15:09:36+5:302018-12-18T15:11:18+5:30
सत्र न्यायालय : पीडितांच्या वडिलांची साक्ष महत्त्वाची
सोलापूर : अल्पवयीन मुलींना पळवून नेऊन त्यांच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी दोन मजुरांना जिल्हा न्यायाधीश-१ सावंत-वाघुले यांनी चार वर्षांची शिक्षा सुनावली.
रमेश हणमंतू मिठापल्ली (वय २१), विशाल चंद्रकांत नाईकवाडी (वय २०, दोघे रा. सोलापूर) अशी शिक्षा झालेल्या दोन मजुरांची नावे आहेत. खटल्याची पार्श्वभूमी अशी की, दोन अल्पवयीन मुली या एकाच शाळेत शिकत होत्या. १ एप्रिल २०१५ रोजी एक मैत्रीण आपल्या दुसºया मैत्रिणीस सोडण्यासाठी नई जिंदगी येथील चौकात आल्या.
तेथे दोघी थांबल्या असता ओळखीचे दोघे आरोपी तेथे आले. त्यांनी मुलींना गाडीवर बसण्यास सांगितले. मुली गाडीवर बसल्या असता त्यांना प्रथम अक्कलकोट तालुक्यातील हैद्रा येथे नेले. तेथे मुलींचा विनयभंग केला. त्यानंतर दोघींना पुणे येथे नेले. तेथून पुन्हा एका मुलीस रेल्वे स्टेशनवर सोडले व रमेश मिठापल्ली याने दुसरीला पुन्हा पळवून नेले. रेल्वे स्टेशनवर सोडलेल्या मुलीने आपल्या नातेवाईकांना फोन लावून माहिती दिली.
या प्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. फौजदार सुनीता पौळ यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या प्रकरणी सरकारतर्फे अॅड. शैलजा क्यातम, आरोपीतर्फे अॅड. अजमोद्दिन शेख यांनी काम पाहिले. कोर्ट पैरवी म्हणून पोलीस कॉन्स्टेबल एस. एस. चव्हाण यांनी काम पाहिले.
दहा साक्षीदार तपासले
- या खटल्यात सरकार पक्षातर्फे एकूण १० साक्षीदार तपासण्यात आले. पीडिता, पीडितेचे वडील व इतर साक्षीदारांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या तसेच सरकारी वकिलांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपीस भादंवि कलम ३६३ अन्वये प्रत्येकी ४ वर्षांची शिक्षा व २ हजार रुपयांचा दंड सुनावला. दंड न भरल्यास ३ महिन्यांची शिक्षा सुनावली. पोक्सो कलम ७ व ८ अन्वये प्रत्येकी दोन वर्षांची शिक्षा व १००० रुपयांचा दंड. दंड न भरल्यास १ हजाराचा दंड व दंडाची रक्कम न भरल्यास २ महिन्यांची शिक्षा सुनावली.