अल्पवयीन मुलीवर अत्याचार; तरुणास दहा वर्षांच्या कारावासाची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2019 10:47 AM2019-07-04T10:47:35+5:302019-07-04T10:48:56+5:30
सोलापूर जिल्हा व सत्र न्यायाधीश; पीडित मुलीस २५ हजार रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश
सोलापूर : शाळा सुटल्यानंतर बालमैत्रिणींबरोबर खेळत असताना त्यांना हुसकावून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी तरुणास जिल्हा व सत्र न्यायाधीश यु. एल. जोशी यांनी दहा वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली, तर पीडित मुलीस २५ हजार रुपयांच्या नुकसानभरपाईचे आदेश दिले.
शिवानंद मल्लप्पा कोळी (वय १९, रा. सोलापूर) असे कारावास सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे. एकेदिवशी अल्पवयीन मुलगी शाळा सुटल्यानंतर मैत्रिणींसोबत मंदिरात खेळत होती. शिवानंद कोळी हा तिथे आला, त्याने अन्य मुलींना तेथून हुसकावून लावले अन् पीडित मुलीला मंदिराच्या पाठीमागील मोकळ्या जागेत नेले. तेथे तुझा गळा दाबतो, तुला मारून टाकतो, अशी भीती घालून तिच्यावर चार वेळा लैंगिक अत्याचार केला. शिवानंद कोळी याच्या भीतीने तिने हा प्रकार कोणाला सांगितला नाही. मात्र, ती त्रास होत असल्याचे सांगत होती, तेव्हा घरच्यांनी विश्वासात घेऊन विचारपूस केली. मुलीने घडलेला सर्व प्रकार आई व आजीला सांगितला. यावर आई व आजीने आरोपीच्या आईला हा प्रकार सांगितला असता तिनेही कोणाला सांगू नका, असे सांगितले.
पीडित मुलीच्या आईने या प्रकरणी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक बी. एच. पाटील व तत्कालीन सहायक पोलीस आयुक्त सुभाष नेवे यांनी तपास करून दोषारोपपत्र दाखल केले होते. सुनावणीदरम्यान सरकारी पक्षाकडून ११ साक्षीदार तपासण्यात आले. या प्रकरणी पीडित बालिका, तिची आई, आजी, डॉक्टर व तपास अधिकाºयांची साक्ष महत्त्वाची ठरली. या प्रकरणी सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी वकील अॅड. गंगाधर रामपुरे तर आरोपीतर्फे अॅड. मनोज गिरी यांनी काम पाहिले. तसेच कोर्ट पैरवी म्हणून महिला पोलीस नाईक अनुराधा गुत्तीकोंडा यांनी काम पाहिले.
फुलण्याआधीच मुलीचे जीवन झाले अंधकारमय : सरकारी वकिलांचा युक्तिवाद
- सुनावणीदरम्यान युक्तिवाद करताना सरकारी वकील अॅड. गंगाधर रामपुरे म्हणाले की, आरोपीने पवित्र मंदिर आवारात केवळ ८ वर्षांच्या व नुकत्याच शाळेत पाऊल ठेवलेल्या चिमुकलीवर अत्याचार केला. या प्रकारामुळे एका कोवळ्या मुलीच्या जीवनात फुलण्याआधीच अंधार झाला आहे. असे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत, त्यामुळे आरोपीला कठोर शिक्षा सुनावण्यात यावी, असा युक्तिवाद अॅड. रामपुरे यांनी केला होता. हा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायाधीशांनी १० वर्षे सश्रम कारावास व ५ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली. पीडित मुलीस २५ हजारांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले.