शिवसेना ठाकरे गटाच्या सोलापूर जिल्हाप्रमुखांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल; जाणून घ्या कारण..
By Appasaheb.patil | Published: July 2, 2023 02:05 PM2023-07-02T14:05:39+5:302023-07-02T14:06:03+5:30
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी उषा हब्बू यांचे पती खेडपाटी बार्शी येथील टोलनाक्याच्या बाजूस पानपट्टी चालवतात. त्या मोकळ्या प्लॉटच्या पाठीमागे गणेश वानकर यांचे मोकळे प्लॉट आहे.
सोलापूर : महिलेला शिवीगाळ करून दमदाटी केल्याप्रकरणी सोलापुरातील शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष गणेश प्रकाश वानकर (रा. इंद्रधनु अपार्टमेंट, मरीआई चौक, सोलापूर) यांच्यासह सहा जणांवर ॲट्रॉसिटी अंतर्गत साेलापूर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत उषा मलिक हब्बू (वय ५५, रा. विश्वविहार सोसायटी, खेड, उत्तर सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी उषा हब्बू यांचे पती खेडपाटी बार्शी येथील टोलनाक्याच्या बाजूस पानपट्टी चालवतात. त्या मोकळ्या प्लॉटच्या पाठीमागे गणेश वानकर यांचे मोकळे प्लॉट आहे. फिर्यादीस गणेश वानकर यांनी तुझी जागा ही बेकायदेशीर आहे, असे म्हणत त्यांना तुच्छतेने बोलत होते. याप्रकरणी त्यांनी कोर्टात खासगी फिर्याद दिली होती. याचा राग मनात धरून १ जुलै रोजी दुपारी फिर्यादी व त्यांच्या घरातील सगळी मंडळी घरात असताना आरोपी गणेश वानकर व त्यांच्यासोबत चार ते पाच जणांनी त्यांना शिवीगाळ करत दमदाटी केली.
तसेच फिर्यादीच्या सुनेचा हात पिरगाळला. शिवाय माझे खडी क्रशरच्या गाड्या आहेत, त्याच्या खाली घालून ठार मारण्याची धमकी दिल्याची तक्रार तालुका पोलिस ठाण्यात दिली आहे. या फिर्यादीवरून गणेश वानकर व त्यांच्या पाच साथीदारांवर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.
खोट्या ॲट्रॉसिटीला आपण कायद्याने उत्तर देणार : वानकर
बार्शी टोल नाक्याजवळील भोगाव हद्दीत अवैध दारू व्यवसायाला विरोध केल्यामुळेच आपल्यावर नियोजनबद्ध आणि जाणीवपूर्वक ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे, अशा खोट्या केसेसला आपण कदापि जुमानणार नाही. याउलट लोकहिताची कामे करत असताना धमक्यांना आपण घाबरणार नाही, असे सांगत खोट्या ॲट्रॉसिटीला आपण कायद्याने उत्तर देणार असल्याचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख गणेश वानकर यांनी सांगितले.