वीज कंपनीच्या कार्यालयावर हल्लाबोल
By admin | Published: June 14, 2014 01:46 AM2014-06-14T01:46:42+5:302014-06-14T01:46:42+5:30
नातेपुतेतील प्रकार; विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू प्रकरण
नातेपुते : कुरभावी (ता. माळशिरस) येथील शेतकरी संजय गोविंद रूपनवर (वय ४0) शेतातील तार बदलण्यासाठी गेले असता, तुटलेल्या तारेचा शॉक बसून जागीच मृत्यू झाला. या घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी संतप्त ग्रामस्थांनी वीज कंपनी कार्यालयावर हल्लाबोल करीत तोडफोड केली.
कुरभावीत चार महिन्यांपासून विजेची वेळ सकाळी साडेआठ ते दुपारी एकपर्यंत व दुपारी ते ३ ते साडेतीनपर्यंत होती. आठ दिवस संजय रूपनवर यांच्या शेतामध्ये लाईटची तार तुटून पडली होती. याबाबत संजय रूपनवर यांनी वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे याबाबत वारंवार तक्रारी केल्या; मात्र वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने त्यांना या तुटलेल्या तारेतील वीज प्रवाहाचा धक्का बसून त्याचा मृत्यू झाला. दरम्यान ते बराच वेळ घरीच न आल्याने शोधाशोध केली असता, शोधणाऱ्यांना मृतावस्थेत ते आढळले.
याबाबत वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना सांगूनही कोणीच लक्ष दिले नाही तर अधिकारी कोल्हे यांना सांगताच मी ढाब्यावर जेवण करीत आहे, असे सांगून थोड्या वेळाने येत असल्याचे सांगितले. दरम्यान, संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी मृतदेह घेऊन वीज कंपनीचे कार्यालय गाठले आणि कर्मचाऱ्यांना विनंती करूनही काहीच उपयोग होत नसल्याने हल्लाबोल करीत कार्यालयाची तोडफोड केली. त्यानंतर ग्रामस्थांनी रस्ता रोको आंदोलन केले. तत्काळ घटनास्थळी अकलूज उपविभागीय पोलीस अधिकारी संजयकुमार पाटील यांनी धाव घेऊन ग्रामस्थांना कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
-----------------------------
कारवाईचा प्रस्ताव
हा सगळा प्रकार घडल्यानंतर कार्यकारी अभियंता चटलवार यांनी ग्रामस्थांची भेट घेऊन सहायक अभियंता कोल्हे व दुय्यम अभियंता बडवे व वायरमन जाधव यांना निलंबित करण्याचा प्रस्ताव पाठवू असे सांगितले.
----------------------------------
वीज कंपनीकडून मदत
मयत शेतकरी संजय रूपनवर यांच्या कुटुंबीयांना तातडीची मदत म्हणून २0 हजार रूपये तर नंतर दोन लाख मदत जाहीर करण्यात आली. रूपनवरच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.