हम यहा के बॉस है म्हणत पोलिसावर चावीने हल्ला करत मारहाण
By दिपक दुपारगुडे | Published: July 9, 2023 03:51 PM2023-07-09T15:51:37+5:302023-07-09T15:52:36+5:30
दोघांवर गुन्हा : रात्री रस्त्यावर क्रिकेट खेळणार्यांना रोखल्याने वाद.
दीपक दुपारगुडे, सोलापूर : रात्र पेट्रोलिंग करताना क्रिकेट खेळणार्यांना रोखल्याच्या कारणाने पोलिसाला चावीने मारून जखमी केल्याप्रकरणी दोघांवर शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पोलिस हेड कॉन्टेबल गणेश रामचंद्र धुमाळ यांनी जेलरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी मोहसीन नन्नुभाई मुल्ला, वसीम नन्नुभाई मुल्ला ( रा. साखर पेठ) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादी गणेश धुमाळ हे जेलरोड पोलिस ठाण्यात डी बी पथकात कार्यरत आहेत. ते रविवारी पहाटे गस्त घालत होते. त्यावेळी १ वाजण्याच्या सुमारास धुमाळ हे रंगा चौक येथे गेल्यानंतर तेथे आठ ते दहा जण सार्वजनिक रस्त्यावर क्रिकेट खेळत होते. त्यात आरोपी मोहसिन मुल्ला हा ही त्यात होता. यामुळे त्यांना आता खेळू नका बॉल कोणाला तरी लागेल असे सांगत असताना 'तू हमे क्रिकेट खेलो मत ऐसा बोलनेवाला कौन' असे म्हणत शिवीगाळ करत 'हम यहा के बॉस है', म्हणत 'ऐसे पोलिस लोगा बहोत देखे' म्हणाला. शिवाय मोहसीन मुल्ला व वसीम मुल्ला यांनी धक्का बुक्की केली. तसेच मोहसिन याने चावीने तोंडावर मारताना फिर्यादीने आडवले, त्यावेळी त्यांच्या बोटाला जखम झाली. दरम्यान, त्यांनी बीट मार्शल यांना बोलवल्यानंतर तेव्हाही शिवीगाळ करत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर आरोपींना पोलिस ठाण्यात नेल्यानंतरही तेथेही शिवीगाळ करत मारण्याकरीता अंगावर धावून आला, अशा आशयाची फिर्याद धुमाळ यांनी दिली आहे. या फिर्यादीवरून मोहसीन मुल्ला, वसीम मुल्ला यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.