आक्षेपार्ह छायाचित्र टाकणारा अटकेत
By Admin | Published: June 9, 2014 01:15 AM2014-06-09T01:15:11+5:302014-06-09T01:15:11+5:30
आणखी एकावर गुन्हा : मजकूर डिलिट करा अथवा पोलिसांना कळवा
सोलापूर : सोशल साईटवर राष्ट्रपुरुषाच्या अवमानप्रकरणाचा तपास सुरू असताना सातत्याने आक्षेपार्ह मजकूर आणि छायाचित्रे एका तरुणाकडून टाकले जात असल्याचे दुसरे एक प्रकरण समोर आले आहे़ चोवीस तासात विजापूर नाका येथे एक तर दुसरा गुन्हा सदर बझार पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे़ दुसऱ्या गुन्ह्यात औदुंबर तुकाराम सरवदे (रा़ उजनी कॉलनी, सोलापूर) याला पोलिसांनी अटक केली आहे़
याबाबत पहिल्या गुन्ह्यात सत्यजीत सुबोध वाघमोडे (वय २१, रा़ नवीन आरटीओजवळ, विजापूर रोड) यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे़ शनिवारी रात्री सत्यजीत यांच्या मोबाईलवर सोशल साईटचा मेसेज आला़ त्या साईटवर जाऊन संबंधित अकौंट पाहिले असता एका राष्ट्रपुरुषाचे अवमानकारक छायाचित्र आणि मजकूर पोस्ट केले गेल्याचे दिसून आले़ याप्रकरणी त्यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली़ याचा तपास गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला़ गुन्हे शाखेत सायबर क्राईममधून हे प्रकरण हाताळत असताना त्याच साईटवर पुन्हा एक अशीच पोस्ट नेहमी टाकणारा अकौंटधारक आढळून आला़ हे अकौंट औदुंबर सरवदे यांंचे असल्याचे स्पष्ट झाले़ त्याच्या अकौंटवर इचलकरंजीतील झकास गु्रपने ही पोस्ट टाकल्याचे आढळून आले़ एका प्रकरणाचा तपास करीत असताना अशाप्रकारे दुसरा गुन्हा उघडकीस आला़ दुसऱ्या प्रकरणात एस़बी़ खाडगे यांनी फिर्याद दिली आहे़
---------------------------------------
गुन्हे शाखेकडून तपास सुरु
या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे़ याबाबत गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त खुशालचंद बाहेती यांच्याशी संपर्क साधला असता फेसबुकवरील संबंधित अकौंट आणि त्याची माहिती मिळविण्यासाठी अमेरिकेतील न्यायालयाकडे विनंती करून माहिती मागवली जाणार असल्याचे सांगितले़ तत्पूर्वी येथील न्यायालयात सोमवारी अमेरिकेतील न्यायालयास पत्रव्यवहार करण्याबाबत अर्ज केला जाणार असल्याचेही ते म्हणाले़ असे काही पोस्ट आपल्या अकौंटवर पडत असतील तर ती तत्काळ काढून टाका, याची पोलिसांना माहिती द्या असे आवाहनही बाहेती यांनी केले आहे़