वर्षभरात चार ठिकाणी पोलिसांवर हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:21 AM2021-04-17T04:21:28+5:302021-04-17T04:21:28+5:30
मागील वर्षी लॉकडाऊन सुरू असताना एप्रिल महिन्यात वागदरी येथे ग्रामदैवत श्री परमेश्वर यात्रा होती. यात्रा करणार नसल्याचे त्यापूर्वीच पंचकमिटीने ...
मागील वर्षी लॉकडाऊन सुरू असताना एप्रिल महिन्यात वागदरी येथे ग्रामदैवत श्री परमेश्वर यात्रा होती. यात्रा करणार नसल्याचे त्यापूर्वीच पंचकमिटीने पत्र पोलीस ठाण्यात दिले होते. यामुळे पोलीस गाफिल राहिले. ऐन यात्रेच्या दिवशी दुपारी हजारोंच्या संख्येने गर्दी जमली. त्याप्रसंगी ग्रामस्थ व पोलीस यांच्या शाब्दिक चकमक होऊन चक्क बंदोबस्तासाठी उपस्थित असलेल्या पोलीस निरीक्षक कलप्पा पुजारी यांच्यावर हल्ला झाला. यामध्ये ते जखमी झाले. त्यानंतर दक्षिण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागुरे तांडा येथे पोलीस कर्मचारी हातभट्टी दारू अड्ड्यावर छापा टाकण्यासाठी गेले. तेव्हा तांड्यातील १० ते १५ जण एकत्र येऊन पोलीस मयूर बोडके यांच्यावर हल्ला केला. त्यानंतर याच हद्दीत ग्रामपंचायत निवडणुकीत मिरजगी येथे एका पोलिसांवर हल्ला करून बंदोबस्त ठिकाणाहून हाकलून लावले. या घटनेचे व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाला होता. याचे गांभीर्य ओळखून कसेबसे दुसऱ्या पोलिसांनी बुलेटवर येऊन त्या पोलीस कर्मचाऱ्याला ठाण्यात आणले.
नुकतेच उत्तर पोलीस ठाण्याच्या हद्दीत किणीमोड तांडा येथे वाळू ट्रॅक्टरवर कारवाई करण्यासाठी गेलेले पोलीस कर्मचारी दूधभाते यांच्यावर हल्ला करून मोटारसायकलची मोडतोड केली. अचानकपणे चालून आलेल्या आठ जणांवर अनेक प्रकारचे गुन्हा दाखल केले आहेत. कारवाई सुरू आहे.
एकंदरीत अक्कलकोट तालुक्यात एकाच वर्षात तब्बल चार ठिकाणी पोलिसांवर वागदरी वगळता इतर ठिकाणी अवैध व्यवसायिकांकडून हल्ला झाला आहे.