हातभट्टी घेऊन जाणारी जीप नाकाबंदीत पोलिसांच्या अंगावर घालून ठार मारण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:23 AM2021-08-29T04:23:37+5:302021-08-29T04:23:37+5:30
बार्शी : हातभट्टी दारूजे ट्यूब घेऊन निघालेली जीप नाकाबंदीत पोलिसांच्या अंगावर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडला. ...
बार्शी : हातभट्टी दारूजे ट्यूब घेऊन निघालेली जीप नाकाबंदीत पोलिसांच्या अंगावर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली तर दोघे पळून जाण्यात यशस्वी झाले. याप्रकरणी चौघावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राम जाधव व मुकुंद जाधव असे अटक केलेल्या दोघांची नावे असून शनिवार, २८ ऑगस्ट रोजी पहाटे अडीचच्या सुमारास पोलिसांनी ६० हजार ५०० रुपयांची ११०० लिटर दारूने भरलेल्या ११ ट्यूब आणि सहा लाख रुपयांची जीप जप्त केली आहे. बार्शी-लातूर रोडवर नागोबाच्या वाडीजवळ पोलिसांनी ही कारवाई केली, याबाबत पोलीस नाईक धनराज केकान यांनी फिर्याद दिली आहे. अजय शिवाजी राठोड, राम देवीदास जाधव, मुकुंद जाधव, अनोळखी व्यक्ती यांच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा व जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस सूत्राकडील माहितीनुसार उत्तर सोलापूर तालुक्यातील बक्षीहिप्परगा येथून हातभट्टी दारूच्या ट्यूब घेऊन एक जीप वाहन पानगावमार्गे बार्शीकडे निघाले होते. बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी जायपत्रे यांना याची कुणकुण लागली. त्यांनी सापळा रचला.
अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी जायपत्रे करत आहेत. या कारवाईत फौजदार प्रवीण जाधव, पोलीस नाईक शेलार, पोलीस कॉन्स्टेबल डोंगरे, राजेंद्र मंगरुळे यांनी सहभाग नोंदवला.
---
मार्ग बदलला तरी लागले पोलिसांच्या हाती...
दारू वाहतूक करणारे मार्ग बदलून निघाल्याची माहिती पोलीस पथकाला मिळाली. याची दखल घेत तालुका पोलिसांनी नाकाबंदी लावून सापळा रचला. परंतु याचीही माहिती हातभट्टी चालकांना मिळाली आणि तेथून रस्ता बदलून दुसऱ्या मार्गे निघाल्याचे या पथकाला समजले. दरम्यान, पोलीस कर्मचारी शेलार यांनी त्यांची गाडी आडवी लावून असता त्यांना चुकवण्यासाठी त्यांच्या अंगावर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न दारू वाहतूक करणाऱ्यांनी केला. यात पोलिसांच्या वाहनाचेही नुकसान झाले आहे.
--------
फोटो : २८ बार्शी क्राईम
बार्शी तालुका पोलिसांनी जीप वाहनासह दारूच्या ट्यूब जप्त करून आरोपींना अटक केली. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी जायपत्रे, फौजदार प्रवीण जाधव, पोलीस नायक महेश डोंगरे, पोलीस नायक प्रकाश उंदरे, शैलेश शेलार, तानाजी धीमधीमे, धनराज केकान.