सोलापूर महापालिकेतील एलबीटीचा घोटाळा दडपण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2019 10:13 AM2019-02-27T10:13:10+5:302019-02-27T10:14:35+5:30
सोलापूर : स्थानिक संस्था कर (एलबीटी) च्या वसुलीत झालेला घोटाळा दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे. याबाबत संस्थांच्या कागदपत्रांची माहिती मागूनही ...
सोलापूर : स्थानिक संस्था कर (एलबीटी) च्या वसुलीत झालेला घोटाळा दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे. याबाबत संस्थांच्या कागदपत्रांची माहिती मागूनही दिली जात नाही, असा आरोप शिवसेनेचे नगरसेवक राजकुमार हंचाटे यांनी केला.
हंचाटे म्हणाले, महापालिकेत अधिकाºयांनी शहरातील एलबीटी वसुलीची चार ते पाच कोटी रुपयांची प्रकरणे परस्पर मिटविली आहेत. एका वाईन दुकानाच्या एलबीटी वसुलीत घोटाळा झाल्याच्या तक्रारी आल्या. याबाबत आम्ही महापालिकेच्या सभेत आवाज उठविला होता. तत्कालीन आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी घोटाळा झाल्याची कबुली देत चौकशी समिती नेमली होती.
या चौकशी समितीने अद्याप अहवाल दिलेला नाही. या घोटाळ्यात महापालिकेतील वरिष्ठ अधिकारी सहभागी आहेत. त्यांनी या घोटाळ्यातून जमलेली माया स्पष्टपणे दिसत आहे. पण आता चौकशी अहवाल दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे. एलबीटी विभागातील अधिकारी ही माहिती देण्यास टाळाटाळ करीत आहेत. या संदर्भात शिवसेनेचे नगरसेवक आगामी सर्वसाधारण सभेत आवाज उठवतील, असा इशाराही हंचाटे यांनी दिला.
तडजोडीची प्रकरणे आर्थिक हितसंबंधाने मिटविली
- हंचाटे म्हणाले, एलबीटीचे अद्याप चार ते पाच कोटी रुपयांचे येणे आहे. शहरातील ४५०० व्यावसायिकांच्या प्रकरणात वसुलीचा आकडा निश्चित करण्यात आला. त्यावर हरकती सुनावणी घेण्यात आल्या. अद्याप २०० फायलींवर निर्णय झालेला नाही. या २०० फायली का दडपून ठेवल्या जात आहेत. एक तर ही प्रकरणे निकाली काढा किंवा थकीत एलबीटी वसूल करा. काही प्रकरणात सीएला हाताशी धरुन दंडाची रक्कम वाढविण्यात आली. ही रक्कम कमी करावी म्हणून अधिकाºयांनी पैसे उकळले. त्याचे पुरावे जमा केले जात आहेत़ सभागृहात ही माहिती दिली जाईल, असेही हंचाटे यांनी सांगितले.
बड्या थकबाकीदारांचा निर्णय कधी घेणार
- शहरातील एक ज्वेलर्स, चार अॅटोमोबाईल्सधारक यांच्याकडील वसुली थकीत आहे. त्यांच्याकडील वसुली कधी करणार असे विचारल्यानंतर एलबीटी विभागातील अधिकारी वरिष्ठ अधिकाºयांकडे बोट दाखवत आहेत. एक रुग्णालय आणि एका साखर कारखान्याकडील मूल्यांकन तयार झालेले नाही. हे सर्व ठरवून केले जात आहे, असेही हंचाटे यांनी सांगितले.