सोलापुरात रेल्वे ट्रॅकवर सापडला मोठा दगड; लोको पायलटमुळे उधळटा कट
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2024 02:30 PM2024-09-10T14:30:27+5:302024-09-10T14:32:56+5:30
सोलापुरात रेल्वे अपघात घडवण्याचा मोठा कट रचण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Solapur Train Accident : उत्तर प्रदेशातील कानपूर आणि राजस्थानातील अजमेर येथे रेल्वे अपघाताची कट रचणाऱ्याची घटना समोर आल्या आहेत. आता महाराष्ट्रातही रेल्वे अपघात घडवण्याठी कट रचला गेल्याचे समोर आलं आहे. सोलापुरमध्ये रेल्वे ट्रॅकवर सिमेंटचा मोठा दगड ठेवण्यात आला होता. या सगळ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वे प्रशासन अलर्ट झालं असून कारवाई सुरु केली आहे. पोलिसांनी तिन्ही प्रकरणांमध्ये गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.
उत्तर प्रदेशातील कानपूर आणि राजस्थानमधील अजमेरनंतर आता महाराष्ट्रातील सोलापूरमध्येही मालगाडी उलटवण्याचा कट उघडकीस आला आहे. सोलापूर जिल्ह्यातील कुर्डुवाडी स्थानकापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या रेल्वे रुळावर सिमेंटचा मोठा दगड सापडला आहे. लोको पायलटच्या सतर्कतेमुळे हा अपघात टळला. याप्रकरणी रेल्वेच्या वरिष्ठ विभाग अभियंत्यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सोलापूर जिल्ह्यातील कुर्डुवाडी रेल्वे स्थानकापासून पूर्वेला ७०० मीटर अंतरावर सिग्नल पॉईंटजवळ रेल्वे रुळावर मोठा सिमेंटचा दगड ठेवून अपघात घडवून आणण्याच्या प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी वरिष्ठ विभाग अभियंता कुंदन कुमार यांनी अज्ञात आरोपींविरोधात फिर्याद दिली आहे.
रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास कुर्डुवाडी रेल्वे स्थानकापासून सातशे मीटर अंतरावर पूर्व दिशेला असलेल्या ट्रॅकवर अज्ञात व्यक्तीने सिमेंटचा मोठा दगड ठेवला. लोको पायलट रियाज शेख आणि जेई उमेश इलेक्ट्रिक रेल्वेच्या ओव्हरहेड वायर्सच्या देखभालीसाठी टॉवर वॅगनला सोलापूर येथून कुर्डुवाडीला घेऊन येत होते. त्यांनी रुळावर दगड पाहिल्यानंतर २०० मीटर आधीच मालगाडी थांबवली आणि रेल्वे अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
दरम्यान, त्याआधी राजस्थानच्या अजमेर जिल्ह्यात रविवारी रात्री रुळांवर सिमेंटचे मोठे ब्लॉक टाकून मालगाडी रुळावरून उतरवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी मंगळवारी सांगितले. फुलेरा-अहमदाबाद ट्रॅकवर सरधना आणि बांगर स्थानकांदरम्यान हा प्रकार घडला. याप्रकरणी, गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
अजमेर येथे रेल्वे रुळावर दोन ठिकाणी ७० किलो वजनाचे सिमेंट ब्लॉक ठेवण्यात आले होते. फुलेराहून अहमदाबादला जाणारी ट्रेन त्यांना तोडत पुढे निघाली. राजस्थानमध्ये १७ दिवसांत तिसऱ्यांदा ट्रेन उलटवण्याचा कट रचला गेला आहे. "काही आरोपींनी रविवारी मालवाहतूक कॉरिडॉरमध्ये सिमेंटचे दोन ब्लॉक रुळावर ठेवले होते, ज्यांना मालगाडीने धडक दिली. परंतु काहीही अनुचित घडले नाही," असे उत्तर पश्चिम रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
उत्तर प्रदेशातील प्रयागराजहून हरियाणातील भिवानीकडे जाणारी कालिंदी एक्स्प्रेस रुळावर ठेवलेल्या गॅस सिलिंडरला धडकल्यानंतर रविवारी ही घटना उघडकीस आली. कानपूर जिल्ह्यातील बिल्हौर रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे ट्रॅकवर ठेवलेल्या एलपीजी गॅस सिलेंडरला एक्स्प्रेसची धडक बसल होती. मात्र लोको पायलटने तात्काळ आपत्कालीन ब्रेक लावले, त्यामुळे एक भीषण अपघात टळला. कालिंदी एक्स्प्रेसच्या चालकाने ट्रॅकवर अज्ञातांनी ठेवलेला एलपीजी सिलिंडर पाहून आपत्कालीन ब्रेक लावला होता. पोलिस सहआयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) हरीश चंद्र यांनी सोमवारी सांगितले की, ८ सप्टेंबर रोजी उशिरा प्रयागराजहून भिवानीकडे जाणाऱ्या कालिंदी एक्स्प्रेसच्या चालकाला बिल्हौर रेल्वे स्थानकाच्या काही अंतरावर ट्रॅकवर ठेवलेला एलपीजी सिलिंडर दिसला. सिलेंडर पाहून चालकाने इमर्जन्सी ब्रेक लावला, मात्र गाडी सिलिंडरला धडकली. थोड्या अंतरावर गेल्यावर तो थांबला.
सिलिंडर इंजिनमध्ये अडकून स्फोट झाला नाही. अन्यथा मोठी दुर्घटना घडू शकली असती. तसंच अचानक इमर्जन्सी ब्रेक लावल्यामुळे ट्रेन रुळावरून घसरली असती. सुमारे २० मिनिटे ट्रेन घटनास्थळी थांबली होती. तपासासाठी ट्रेन पुन्हा बिल्हौर स्थानकावर थांबवण्यात आली होती.