एकाच रात्रीत आठ ठिकाणी चोरीचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:17 AM2021-06-06T04:17:09+5:302021-06-06T04:17:09+5:30
याबाबतची अधिक माहिती अशी की, ६ मे रोजी रात्री नेमतवाडी येथील अजिनाथ गायकवाड यांच्या घरासमोर लावलेली दुचाकी चोरट्यांनी पळवली, ...
याबाबतची अधिक माहिती अशी की, ६ मे रोजी रात्री नेमतवाडी येथील अजिनाथ गायकवाड यांच्या घरासमोर लावलेली दुचाकी चोरट्यांनी पळवली, तर चंद्रकांत पवार व त्यांचे कुटुंब घराच्या दरवाज्याची कडी न लावता झोपल्याचा फायदा घेऊन त्यांच्या घरातील कपाट उघडून कपाटातील २० हजार रोख व २० हजारांची एक तोळ्याची बोरमाळ, ३५ हजारांचे पावणेदोन तोळे सोन्याचे २ गंठण, २० हजारांच्या अर्धा अर्धा तोळा सोन्याच्या २ अंगठ्या, ५ हजार रुपयांची कानातील बाळी, एक बदाम, तीन नथी, १० हजारांची फुले-झुबे अर्धा तोळे व १ हजार ७५० रुपयांचे चांदीचे दागिने असा १ लाख ११ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. त्यांनतर नरसिंह खोत व हनुमंत गोसावी यांच्या घरी चोरी करण्याचा प्रयत्न फसला.
करकंब येथील देशमुख पट्टा येथे अजिनाथ गायकवाड यांची चोरून आणलेली दुचाकी रस्त्याच्या बाजूला सोडली आणि तेथून अर्जुन देशमुख यांची आई राहत असलेल्या घराचा दरवाजा उघडून घरातील साहित्य अस्ताव्यस्त टाकले; परंतु देशमुख यांची आई परगावी गेल्यामुळे चोरट्यांनी काय चोरी केले याचा अंदाज लागला नाही. दगडू खारे यांच्या घरी चोरी करणे अशक्य झाल्याने फक्त दारात सोडलेल्या चप्पलची चोरी केली. नेमतवाडी हद्दीतील दगडू माने यांच्या घरी चोरटे आल्याची कुणकुण अगोदरच माने यांना लागल्याने चोरट्यांचा डाव फसवला. याबाबत चंद्रकांत पवार यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे.
करकंब पोलिसांनी घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा केला. सपोनि प्रशांत पाटील यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन श्वानपथक आणि फिंगरप्रिंट पथकाला पाचारण केले. या दोन्ही पथकांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती जाणून घेतली.