परिचारक राष्ट्रीय समाज पक्षात येतील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 06:48 AM2021-02-05T06:48:52+5:302021-02-05T06:48:52+5:30
राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर हे माजी नगरसेवक आदित्य फत्तेपूरकर यांच्या घरी सदिच्छा भेटीसाठी आले होते. यादरम्यान त्यांनी ...
राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर हे माजी नगरसेवक आदित्य फत्तेपूरकर यांच्या घरी सदिच्छा भेटीसाठी आले होते. यादरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. माजी नगरसेवक आदित्य फत्तेपूरकर, माउली सगर, पोपट क्षीरसागर, परमेश्वर पुजारी, आबासाहेब मोटे यावेळी उपस्थित होते.
आ. गोपीचंद पडळकर राज्यभर दौरे करत आहेत. त्यांना भाजप ओबीसीचा चेहरा म्हणून पुढे करतात का, असा प्रश्न त्यांना विचारला. त्यावर जानकर म्हणाले, प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. ते त्यांचा पक्ष वाढवण्यासाठी काम करत आहेत. मला साइड ट्रॅक करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. माझ्या पक्षामध्ये सर्वसमाजाचे नेते आहेत. माझ्या पक्षात प्रशांत पारिचारक येऊ शकतात. प्रशांत परिचारक तिकडे राहिले तर उमेश परिचारक तर माझ्या पक्षामध्ये येऊ शकतात, असे त्यांनी स्पष्ट केले.
पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत पंढरपूरची जनता भूमीपुत्रालाच साथ देईल. पंढरपूरची जनता सुज्ञ आहे. यामुळे बाहेरून कोणी आलं आणि कोणी गेलं याचा फरक पोटनिवडणुकीत पडणार नाही. राष्ट्रीय समाज पक्षाची पंढरपूरमध्ये ताकत कमी आहे. त्यासाठी संघटनात्मक बांधणी वाढवणार आहे. त्याचबरोबर मागील आठ दिवसांपासून पक्षबांधणी राजभर दौरेही सुरू आहे, असेही ते म्हणाले.
मराठा आरक्षणास कोणाचाच नाही विरोध
वीजबिल माफ करण्याबाबत आश्वासन दिले होते. परंतु महाविकास आघाडी घूमजाव करत आहे. वीजबिल माफ झाले पाहिजे या मागणीबाबत भाजप किती गंभीर आहे, काय माहीत नाही. परंतु रासपची तीच मागणी आहे. मराठा आरक्षणाला कोणत्याच सरकारचा विरोध नाही. यामुळे मराठा समाजातील तरुणांनी आक्रमक होण्याची गरज नसल्याचे महादेव जानकर यांनी सांगितले.