वाळू उपसाच्या निविदा प्रक्रियेकडे सोलापूरकरांचे लक्ष; नागरिकांना करावा लागणार ऑनलाईन अर्ज!
By संताजी शिंदे | Published: June 2, 2023 01:14 PM2023-06-02T13:14:07+5:302023-06-02T13:14:18+5:30
वाळू धोरण : कमी दराने निविदा भरणाऱ्यांना होणार मक्ता निश्चित
सोलापूर : संपूर्ण सोलापूरकरांचे लक्ष लागून असलेल्या वाळू उपसाच्या निविदा प्रक्रियेकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे. शासनाच्या वाळू धोरणानुसार नागरिकांना अवघ्या ६०० रुपये ब्रास वाळूची विक्री केली जाणार आहे. त्यासाठी कमी दराने निविदा भरणाऱ्यांना वाळूचा मक्ता निश्चित केला जाणार आहे. वाळूसाठी नागरिकांना ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे.
गेल्यावर्षी जून २०२२ मध्ये राज्यात सत्तांतर झाले. भाजप-शिवसेनेची सत्ता आल्यानंतर रखडलेल्या वाळू लिलावाबाबत शासनाच्या धोरणाकडे राज्याचे लक्ष लागले होते. महसूल मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी मार्च-२०२३ मध्ये शासनाचे धोरण जाहीर केले. राज्यातील वाळू माफियांना आळा घालण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे जाहीर करण्यात आले. जी वाळू सध्या ८ ते १० हजार रुपये ब्रास मिळते ती सर्वसामान्य जनतेला ६०० रुपये ब्रास मिळावी हा उद्देश असल्याचे जाहीर केले होते. मात्र, याची अंमलबजावणी कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते.
राधाकृष्ण विखे-पाटील हे अहमदनगरचेही पालकमंत्री आहेत. त्यामुळे त्यांनी प्रथमत: तेथे शासनाच्या वाळू धोरणाची अंमलबजावणी केली. त्यानंतर नाशिक येथेही अंमलबजाणवणी झाली. सोलापुरात कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. शासनाच्या धोरणाप्रमाणे जिल्हा प्रशासनाने भीमा नदीच्या पात्रातील वाळू उपशाचे ठिकाण निश्चित केले आहे. वाळू उपशासंदर्भात निविदा प्रक्रिया सुरू केली आहे, त्यासाठी सात दिवसांची मुदत देण्यात आली आहे. भीमा नदीतील निश्चित केलेल्या ठिकाणापासून वाळू डेपोपर्यंत वाहतूक करण्याची निविदा काढण्यात येत आहे.
जूनमध्येच मिळणार वाळू
० निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे, त्यानंतर वाळू उपशाची लिलाव प्रक्रिया केली जाणार आहे. त्यासाठी सात दिवसांची मुदत असणार आहे. निश्चित केलेल्या ठिकाणावरून मशीनने उपसा केलेल्या ठिकाणावरून वाळू निश्चित केलेल्या डेपोपर्यंत आणली जाणार आहे. तेथून नागरिकांना वाळू दिली जाणार आहे, अशी माहिती प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठाेंबरे यांनी दिली.