सोलापुरातील बाललीलेतील गणरायाचे भक्तांना आकर्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2019 01:14 PM2019-08-22T13:14:51+5:302019-08-22T13:17:09+5:30
सोलापुरी गणपती; नगर, पेण, अमरापूर येथील गणेशमूर्ती; बालगोपाळांसाठी भक्तांची खास मागणी
यशवंत सादूल
सोलापूर : अवघ्या काही दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवाची तयारी सर्वत्र सुरू आहे. राज्यात आलेल्या पुराच्या संकटातून सावरण्यासोबत येणाºया संकटावर मात करण्याची शक्ती मिळावी. या हेतूने साध्या स्वरूपात का होईना उत्सव साजरा करण्यासाठी सार्वजनिक मंडळे तयारीत आहेत. संकटमोचक लाडक्या गणरायाच्या स्वागतासाठी सर्व कुटुंबीय आतुर आहेत. आपल्या विविध बाललीलातून सर्वांचे लक्ष वेधून घेणाºया गणेशमूर्ती पूजनासाठी घरी आणण्याकडे सोलापूरकरांचा कल दिसून येत आहे.
शहरातील विविध स्टॉल्सवर अशा बाललीलेतील गणपतीची आगाऊ नोंदणी झाली आहे.
पूर्व भागातील व्हिवको प्रोसेस येथील दुर्गा आर्टस, टिळक चौक येथील वसंत कॅप, भडंगे विठ्ठल मंदिर येथील सुपेकर बंधू यांच्यासह शहरातील अनेक स्टॉल्सवर अशा गणेशमूर्ती विक्रीसाठी आहेत. विक्रीसाठी असलेल्या तीन ते साडेतीन हजार गणेशमूर्तींपैकी पंचवीस ते तीस टक्के बालगणेश मूर्ती आहेत़ दिवसेंदिवस या मूर्तीची क्रे झ वाढत आहे व मागणीतही वाढ होत आहे, असे मूर्तिकार व विक्रेते विठ्ठल मुनगा-पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. यातील बहुतेक मूर्ती या पेण, नगर, अमरापूर येथून मागविण्यात आल्या आहेत. साधारणत: एक ते दोन फूट उंचीच्या या आकर्षक रेखीव मूर्ती असून, साधारणत: अकराशे ते साडेतीन हजार रुपयांपर्यंत त्यांच्या किमती आहेत.
सोलापुरातील काही मूर्तिकारांनी या मूर्तींवर बारीक टिकल्या, कुंदन, मोती, सोनेरी पट्टे, चमकी आदींनी सजावट केली आहे. त्याचा वेगळाच प्रभाव पडतो आहे.
मूर्तीकडे पाहताक्षणीच प्रेमात..
- आपल्या घरातील लहान मुलाच्या विविध लीला पाहण्यात, त्याच्या सुरस कथा कौतुकानं सांगण्यात सर्वांनाच आनंद होत असतो. याच लीला गणरायाच्या रूपात बालगोपालांसह सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. गादीवर पहुडलेला, नंदीवर आरूढ, डमरू वाजविणारा, वासराला माया करणारा, कासवावर, सिंहावर आरूढ अशा अनेक बालरूपात गणराय साकारले आहेत. घरातील लहान मुले या मूर्तीकडे पाहताक्षणीच त्याच्या प्रेमात पडतात अन् या मूर्तीसाठी आपल्या पालकांकडे हट्ट धरत आहेत. त्यांच्यासाठी ही आनंद पर्वणीच.