मार्गशीर्ष महिना विशेष; गोपाळपूरच्या विष्णूपद मंदिरावर आकर्षक रोषणाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 04:37 AM2020-12-16T04:37:28+5:302020-12-16T12:54:47+5:30
मार्गशिर्ष महिन्यास मंगळवारपासून प्रारंभ झाला. या मंदिरात विठ्ठलाचे वास्तव्य असल्याची अख्यायिका सांगितली जाते. त्यामुळे महिनाभर या मंदिरात भाविकांची दर्शनासाठी ...
मार्गशिर्ष महिन्यास मंगळवारपासून प्रारंभ झाला. या मंदिरात विठ्ठलाचे वास्तव्य असल्याची अख्यायिका सांगितली जाते. त्यामुळे महिनाभर या मंदिरात भाविकांची दर्शनासाठी वर्दळ राहणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करून भाविकांना येथे दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे. चंद्रभागेच्या पात्रात असलेले विष्णूपद मंदिराचे विठ्ठलाच्या दर्शनासाठी येथे येणारा प्रत्येक भाविक भेट देतो. मार्गशिर्ष शुद्ध प्रतिपदा ते मार्गशिर्ष वद्य अमावास्या या काळात महिनाभर विठुरायाचे वास्तव्य याच मंदिरात असल्याची अख्यायिका आहे. त्यामुळे येथे महिनाभर दररोज पहाटे व संध्याकाळी विठुरायाची आरती होत असते. या शिवाय विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजनदेखील येथे करण्यात येते. मंदिर नदीपात्रात असल्याने संपूर्ण मंदिराला बॅरेकेटींग करण्यात आले आहे. मुख्य गाभाऱ्यातील देवाच्या पाऊल खुणा असलेल्या भागालाही बॅरिकेटींग करण्यात आल्यामुळे भाविकांना यावर्षी दुरुनच दर्शन घ्यावे लागणार आहे. पंढरपूर नगरपालिकेच्यावतीने या मंदिर परिसरात स्वच्छता तसेच दिवाबत्तीची सोय केली आहे.
असे पडले विष्णूपद नाव
विष्णूपद मंदिराची अख्यायिका चंद्रभागा पात्रातील विष्णूपद मंदिरात गायीच्या पावलांचे ठसे, कृष्णाने राधा अन् गायींसाठी वाजविलेली बासरी, शिवाय कृष्णाने आपल्या सवंगड्यासह काला करून खाल्लेली काल्याच्या वाटीच्या खुणा दगडामध्ये कोरलेल्या दिसून येतात. या बरोबरच भगवान विष्णूची पावलेदेखील उमटलेली दिसतात. त्यामुळे या ठिकाणाला विष्णूपद असे नाव पडल्याचे सांगितले जाते.