विठ्ठल मंदिर देशात नंबर एक बनविणार, अतुल भोसले : पहिल्याच बैठकीत मंदिर समिती अध्यक्षांचा निर्धार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2017 10:56 AM2017-07-22T10:56:35+5:302017-07-22T10:56:35+5:30
-
आॅनलाइन लोकमत सोलापूर
पंढरपूर दि २१ : श्री विठ्ठल-रुक्मिणीमाता हे गरीब, कष्टकरी आणि शेतकऱ्यांचे देव आहे़ लाखो भाविक पायी चालत विठुरायाच्या दर्शनासाठी येतात. या देवस्थानचे एक वेगळे मॉडेल तयार करून देशातील क्रमांक एकचे देवस्थान बनविणार असल्याचा निर्धार श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ़ अतुल भोसले यांनी व्यक्त केला.
पंढरपूर येथील संत तुकाराम भवन येथे २१ जुलै रोजी झालेल्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या पहिल्याच बैठकीत ते बोलत होते़ या बैठकीस मंदिर समितीचे सदस्य ह़ भ़ प़ गहिनीनाथ महाराज औसेकर, संभाजी शिंदे, सचिन अधटराव, शकुंतला नडगिरे, नगराध्यक्षा साधना भोसले यांच्यासह अन्य सदस्य, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विजय देशमुख, व्यवस्थापक विलास महाजन, हनुमंत ताटे आणि अन्य कर्मचारी उपस्थित होते.
बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत डॉ़ अतुल भोसले म्हणाले, वारकरी संप्रदायाचा विरोध असणारा देणगी दर्शनाचा ठराव मंदिर समितीने नामंजूर केला आहे. मंदिराचे पावित्र्य जपणे हे समितीचे आद्य कर्तव्य आहे. पूर्वापार चालत आलेल्या प्रथा, परंपरा जपून देवाचे नित्योपचार केले जातील. देवाच्या पूजेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही़ मंदिर समितीचा पारदर्शी कारभार करण्यावर भर असेल़ पर्यटन विकास महामंडळाचे भक्तनिवास कायमस्वरूपी मंदिर समितीच्या ताब्यात घेण्याचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले़
नव्याने बांधण्यात येत असलेले भक्तनिवास कार्तिकी यात्रेपूर्वी भाविकांच्या सेवेसाठी तयार होईल़ यासाठी संबंधित ठेकेदारास तशा प्रकारच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या भक्तनिवासात भाविकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी मंदिर समितीचा प्रयत्न असेल. पुट्टपूर्तीच्या धर्तीवर भाविकांना मंदिरात सेवा करण्याची संधी देण्यासंदर्भात आराखडा तयार करण्याच्या सूचना या बैठकीत देण्यात आल्या आहेत़ राज्य सरकारच्या अन्न आणि औषध प्रशासनाच्या नियमानुसार मंदिर समितीचे अन्नछत्र चालविण्यात येणार आहे.
मंदिर समितीच्या उत्पन्नातून शहराच्या विकासाला निधी मिळावा, अशी मागणी नगराध्यक्षा आणि मंदिर समितीच्या सदस्या साधना भोसले यांनी केली. यावर सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगत अध्यक्ष अतुल भोसले यांनी विठुरायाच्या दानशूर भक्तांशी चर्चा करू आणि देणगीस्वरुपातून पंढरपूरचा विकास साधण्याचा मनोदय आहे़ तसेच सीआरएसच्या माध्यमातून देखील पंढरपूरच्या विकासाला निधी उपलब्ध करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. भाविकांना सुलभ दर्शन घेता यावे यासाठी स्काय वॉकचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत़ तसेच यापुढे मंदिर समितीची बिले महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकाऱ्यांनी तपासल्याशिवाय दिली जाणार नाहीत, असा महत्त्वपूर्ण निर्णय या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयामुळे समितीचे पैसे वाचण्यास मदत होणार आहे.
-----------------------
अधिकारी, कर्मचाऱ्यांना असेल ड्रेसकोड
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना ड्रेसकोड दिला जाणार आहे. तसेच जे कर्मचारी आपल्या सेवेत चुका करतील, त्यांच्या चुकीला माफ नाही़ त्यामुळे प्रत्येक सेवेकरीने प्रामाणिकपणे पांडुरंगाची सेवा बजावावी, असा सल्ला पहिल्याच बैठकीत डॉ़ अतुल भोसले यांनी कर्मचाऱ्यांना दिला आहे.
संत विद्यापीठ याच कार्यकालात पूर्ण करणार
पंढरपुरात संत विद्यापीठ व्हावे, ही अनेक महाराज आणि वारकऱ्यांची इच्छा आहे़ शिवाय हा विषय माझ्या आवडीचा असून आपण तो मनावर घेतला आहे़ आमच्या समितीच्या कार्यकाळातच हे विद्यापीठ उभे राहावे, यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे डॉ़ अतुल भोसले यांनी सांगितले़