अबब ! गायीच्या पोटात निघाला १०० किलो कचरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2018 11:45 AM2018-09-01T11:45:48+5:302018-09-01T11:49:35+5:30
तीन तास शस्त्रक्रिया, प्लास्टिकसह अनेक वस्तूंचा समावेश
सोलापूर : पूर्व भागातील जय संतोषी माता गोशाळेत कोंडवाड्यातून आणून सोडलेल्या गायीच्या पोटात १०० किलोचा कचरा निघाला आहे. तीन तास चाललेल्या शस्त्रक्रियेद्वारे पोटातून प्लास्टिक, खिळे, काचा अशा अनेक वस्तू बाहेर निघाल्यामुळे मृत्यूशय्येवर असलेल्या गायीला जीवदान मिळाले आहे.
महानगरपालिकेच्या कोंडवाड्यात बेवारस जनावरांना आणून ठेवले जाते. यामध्ये गायींचे प्रमाण मोठे असते. ठराविक कालावधीत मूळ मालकाने ओळख पटवून गायी न नेल्यास गोशाळेला दान करण्यात येतात. अशाच प्रकारातील पाच गायी २६ आॅगस्ट रोजी जय संतोषी माता गोशाळेला महापालिकेच्या वतीने देण्यात आल्या. पाचपैकी एक गाय गेल्या चार दिवसांपासून आजारी होती. बुधवारपासून गायीने हालचाल करणे बंद केले होते.
डोळेही पांढरे झाले होते. काहीतरी गंभीर आजार झाल्याचे लक्षात आल्याने गोशाळा चालकाने डॉक्टरांना पाचारण केले. डॉ. विश्वजित बडगेरी आणि त्यांचे सहकारी डॉ. अतकर यांनी गायीला तपासून तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. शुक्रवारी शस्त्रक्रिया करण्याचे ठरले. परंतु सायंकाळी गायीची प्रकृती अधिकच खालावल्याने गुरुवारी सायंकाळी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. सायंकाळी ६.३० ते रात्री ९.३० या दरम्यान शस्त्रक्रिया करून जवळपास गायीच्या पोटातून १०० किलोचा कचरा काढण्यात आला. या शस्त्रक्रियेमुळे मृत्यूशय्येवर असलेल्या गायीला जीवनदान मिळाले आहे.
...तर चारा खात नाही
- रस्त्यावर भटकणाºया बेवारस गायींना प्लास्टिक आणि तत्सम पदार्थ खाण्याची सवय लागलेली असते. अशा गायी सकस आहार म्हणजे चारा किंवा भुसा खात नाहीत. त्यामुळे गोशाळेत आणल्यावर अनेक वेळा उपाशी राहून त्यांच्यावर प्राण गमवायची वेळ येते, अशी माहिती डॉ. गाजूल यांनी दिली.
शस्त्रक्रियेत १०० टाके
- गायीच्या पोटात खिळे, बांगड्या, पैशाची नाणी, प्लास्टिकच्या पिशव्या, इलेक्ट्रिक साहित्य, नारळाच्या वाट्या, पेन्सिल, खोडरबर अशा अनेक वस्तू आढळल्या. तीन तास चाललेल्या शस्त्रक्रियेत चार पदर मिळून एकूण १०० टाके घालण्यात आले.
घरातील शिळे अन्न एका प्लास्टिकच्या पिशवीत एकत्र करून रस्त्यावर टाकले जाते. त्याच पिशवीत, बांगड्या, खिळे, नारळाच्या वाट्या आणि इतर सर्व प्रकारचा कचरा असतो. हे शिळे अन्न गाय पिशवीसह खाते. त्यामुळे पोटात कचरा साठतो. लोकांनी कचरा टाकताना मुक्या जनावरांच्या जीवाला धोका होऊ नये, यासाठी केवळ शिळे अन्न टाकावे.
- डॉ. राजेंद्र गाजूल, चालक, जय संतोषी माता गोशाळा