सोलापुरातील उपप्रादेशिक परिवहनच्या जप्त वाहनांचा २१ सप्टेंबरला लिलाव
By Appasaheb.patil | Published: September 14, 2022 12:00 PM2022-09-14T12:00:20+5:302022-09-14T12:00:26+5:30
लिलावात बस, ट्रक, डी व्हॅन, पिकअप व्हॅन, टुरिस्ट टॅक्सी, जेसीबी या वाहनांचा समावेश
सोलापूर : मोटार वाहन कर न भरलेल्या व मोटार वाहन कायद्यातील विविध गुन्हयांतर्गत जप्त केलेल्या २५ वाहनांचा जाहीर ई-लिलाव उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, सोलापूर येथे २१ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ११ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत होणार आहे.
वाहने उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, सोलापूर येथील आवारात १२ सप्टेंबर ते १९ सप्टेंबर २०२२ दरम्यान कार्यालयीन वेळेत पाहणीसाठी उपलब्ध आहेत. जाहीर ई-लिलावात एकूण २५ वाहने उपलब्ध आहेत. यात बस, ट्रक, डी व्हॅन, पिकअप व्हॅन, टुरिस्ट टॅक्सी, जेसीबी या वाहनांचा समावेश आहे. तसेच ई-लिलावाच्या तारखेपर्यंत वाहन कर भरण्याची संधी राहील, याची वाहन मालकांनी नोंद घ्यावी. ई-लिलाव होणाऱ्या वाहनांची यादी जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर यांचे सूचना फलकांवर जनतेच्या माहितीसाठी लावण्यात आली आहे.
इच्छुक व्यक्तींना वाहनांची प्रत्यक्ष पाहणी करता येईल. ई-लिलावात सहभागी होण्यासाठी 19 सप्टेंबर 2022 या कालावधीमध्ये उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, सोलापूर येथे खटला विभागात सकाळी ११ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत प्रत्येक वाहनांसाठी पन्नास हजार रूपयाचा डिमांड ड्राफ्टसह ऑनलाईन सादर केलेल्या कागदपत्रांच्या प्रती, नाव नोंदणी करणे व कागदपत्रे पडताळणी, अप्रुव्हल करुन घेण्यासाठी सादर करणे गरजेचे आहे.
लिलावाचे अटी व नियम सोमवार १२ सप्टेंबर २्०२२ पासून कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, सोलापूर येथील नोटीस बोर्डावर सकाळी ११ ते दुपारी ५ वाजेपर्यंत उपलब्ध राहील. सदर वाहने “जशी आहेत तशी" या तत्त्वावर जाहिर ई-लिलावाद्वारे विकली जातील. कोणतेही कारण न देता सदर जाहिर लिलाव रद्य करण्याचे अथवा तहकूब ठेवण्याचे अधिकारी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी तथा कराधान प्राधिकारी, सोलापूर यांनी स्वत:कडे राखून ठेवले आहेत.