ऊन पडले की वन्यजीवांसाठीचे पाणवठे भरतील अॅटोमॅटीक; ३० ठिकाणी सोलार वॉटर पंप, पाणी भरण्याची चिंता मिटली
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2023 05:27 PM2023-03-04T17:27:41+5:302023-03-04T17:27:53+5:30
जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मिळालेल्या निधीतून हे पंप उभारले जाणार आहेत.
शीतलकुमार कांबळे -
सोलापूर : जिल्ह्यातील वन विभागाच्या कार्यक्षेत्रात ३० ठिकाणी सोलार वॉटर पंप बसविण्यात येणार आहे. यामुळे अॅटोमॅटीक पद्धतीने पाणवठे पाण्याने भरले जाणार आहेत. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मिळालेल्या निधीतून हे पंप उभारले जाणार आहेत.
वन विभागाने उन्हाळ्याच्या दिवसांत वन्य प्राण्यांची पाण्याअभावी भटकंती होऊ नये, म्हणून पाणवठे निर्माण केले. या पाणवठ्यामध्ये पावसाचे पाणी झिरपले नसल्याने उन्हाळ्याच्या दिवसात हे पाणवठे कोरडे पडतात. यामुळे वानर, हरीण सारखे अनेक प्राणी तहान भागवण्यासाठी गावाकडे धाव घेतात. काही दिवसांपूर्वी पाण्याच्या शोधात जाणाऱ्या काळवीटांचा केगाव येथे मृत्यू झाला होता. त्यामुळे हे पाणवठे उन्हाळ्यात पाण्याने भरणे गरजेचे आहे.
ज्या ठिकाणी नेहमी पाणी देणे शक्य नाही, जिथे वन्यजीव अधिक प्रमाणात असतात, जे पाणवठे दूर आहेत अशा ठिकाणी सोलप वॉटर पंप बसविण्यात प्राधान्य देण्यात येत आहे. ऊन पडले की पंप अॅटोमॅटीक सुरु होतील. पाणवठ्यामध्ये पाणी भरले जाईल. पाणी भरले की पंप अॅटोमॅटीक बंद होईल. यामुळे वन परिसरातील माणसाच्या वावरही कमी होणार आहे.
वन विभागाच्या अंतर्गत येत असलेल्या पाणवठ्यामध्ये दर १५ दिवसांनी पाणी भरण्यात येत आहे. यासाठी टँकरची सोय करण्यात आली आबे. यासोबतच जिल्ह्याच्या ३० ठिकाणी सोलर वॉटर पंप सुरु बसविण्यात येणार आहे. यामुळे तिथल्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे.
- धैर्यशील पाटील, उपवनसंरक्षक, वन विभाग