आषाढी वारी विशेष ; पंढरपूरातील भाविकांसाठी १ लाख २० हजार लिटर केरोसीनचा कोटा उपलब्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 02:48 PM2018-07-20T14:48:51+5:302018-07-20T14:50:43+5:30
३५ हजार गॅस सिलिंडरची व्यवस्था : काळाबाजार रोखण्यासाठी दोन पथके, राखीव विक्रेत्यांसह प्रशासन सज्ज
मोहन डावरे
पंढरपूर : आषाढी यात्रा सोहळ्यासाठी येणाºया पालख्या, दिंड्यांमधील भाविकांची सोय व्हावी, यासाठी पंढरपूर पुरवठा विभागाने ३५ हजार गॅस सिलिंडर व १ लाख २० हजार लिटर केरोसीनचा कोटा उपलब्ध केला आहे. यात्रा कालावधीत गॅस व केरोसीनचा काळाबाजार रोखण्यासाठी दोन फिरती पथके, गर्दीत भाविकांना त्रास होऊ नये म्हणून १२ राखीव विक्रेत्यांसह पुरवठा विभागाची यंत्रणा सज्ज ठेवली आहे.
पंढरपूरला भरणाºया यात्रा सोहळ्यांपैकी आषाढी यात्रा सोहळा हा सर्वांत मोठा यात्रा सोहळा म्हणून प्रसिद्ध आहे. या सोहळ्यासाठी श्रीसंत तुकाराम, श्रीसंत ज्ञानेश्वर, श्रीसंत गजानन महाराज, श्रीसंत एकनाथ महाराज, श्रीसंत मुक्ताबाई, श्रीसंत सोपान काका आदी पालख्यांसह अनेक लहान-मोठ्या दिंड्या येतात. दिंड्यांशिवाय देशाच्या कानाकोपºयातून येणाºया भाविकांसह देश-विदेशातूनही लाखो भाविक पंढरपुरात येतात.
आषाढी यात्रा सोहळ्यासाठी येणारे भाविक दोन ते तीन दिवस मुक्कामी असतात. प्रमुख पालख्या तर गोपाळकाल्यापर्यंत पंढरपूर मुक्कामी असतात. या पालख्यांमधील भाविकांची स्वयंपाकाची गैरसोय होऊ नये म्हणून प्रत्येक वर्षी पुरवठा विभागाकडून मागेल त्याला गॅस व केरोसीनचा कोटा त्या त्या ठिकाणी उपलब्ध करून दिला जातो.
यावर्षीही पुरवठा विभागाने योग्य नियोजन करत यात्रा सोहळ्यासाठी येणाºया पालख्या व भाविकांना तालुक्यातील पहिला मुक्काम पिराची कुरोली, भंडीशेगाव, वाखरी, ६५ एकर पालखीतळ, शहरातील प्रमुख मठ, चौक, धर्मशाळा त्या त्या परिसरात ३५ हजार गॅस सिलिंडर व १ लाख २० हजार लिटर केरोसीनचा कोटा उपलब्ध केला आहे. याच्या वितरणासाठी ठराविक वितरकांची व्यवस्था करण्यात आली असून त्याचे वितरण करताना शासकीय अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, भ्रष्टाचार निर्मूलन पथकाचे पदाधिकारी यांच्या समक्ष वितरण करून काळाबाजार रोखण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
या वितरकांमार्फत यात्रा कालावधीत मागेल त्याला गॅस वितरित केला जाणार आहे. त्यासाठी त्या त्या दिंड्यांचे पास, ओळखपत्र व रिकामे सिलिंडर जमा करणे अनिवार्य असल्याचे पुरवठा विभागाच्या अधिकाºयांनी सांगितले. यात्रा कालावधीत येणाºया भाविकांना त्या त्या ठिकाणी केरोसीन उपलब्ध व्हावे, यासाठी शहरात ४१ हॉकर्सची व्यवस्था करण्यात आली आहे. या हॉकर्सना गरजेनुसार दिवसातून एक फेरी, दोन फेºया करण्याचे आदेश दिले आहेत.
गॅस वितरणासाठी १० विक्रेते
पालख्यांनी पंढरपूर तालुक्यात प्रवेश केल्यानंतर पिराची कुरोली पालखीतळ, भंडीशेगाव, वाखरी, ६५ एकर, चंद्रभागा वाळवंट, शहरातील प्रमुख धर्मशाळा, मठ व चौकांमध्ये गॅस वितरित करण्यासाठी अश्विनी गॅस, बालाजी गॅस, अरुणा गॅस (पंढरपूर) या शहरातील प्रमुख विक्रेत्यांशिवाय शिवज्योती गॅस एजन्सी (भोसे), ज्योतिर्लिंग गॅस (करकंब), पांडुरंग गॅस (कासेगाव), शांतीसागर गॅस (मंगळवेढा), विठ्ठल गॅस (टाकळी सिकंदर), लक्ष्मी गॅस (गुरसाळे) आदी ग्रामीण भागातील गॅस वितरकांची मदत घेतली जाते.
१२ राखीव विक्रेते
यात्रा कालावधीत हॉकर्सना काही मठ, धर्मशाळा, पालखीतळ, चौक याठिकाणी केरोसीन, गॅस वितरणाची सूचना केलेली असते. मात्र गर्दीमुळे काहीवेळा ते त्या ठिकाणी पोहोचू शकत नाहीत. त्यामुळे भाविकांची होणारी गैरसोय लक्षात घेता १२ राखीव विक्रेते तयार ठेवण्यात आलेले आहेत. अधिकृत विक्रेते त्या त्या ठिकाणी वेळेत न पोहोचल्यास या राखीव विक्रेत्यांमार्फत केरोसीनचे वितरण करण्यात येणार आहे. त्यामुळे भाविकांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता यावेळी पुरवठा विभागाने प्रथमच घेतली आहे.
काळाबाजार रोखण्यासाठी दोन पथके
यात्रा कालावधीत पुरवठा विभागाकडून भाविकांसाठी नेहमीच्या तुलनेत मुबलक केरोसीन व गॅसचा पुरवठा उपलब्ध केला जात असला तरी त्याचे वितरण गरजू भाविकांपर्यंत होत नसल्याच्या अनेकदा प्रशासनाकडे तक्रारी आल्या आहेत. याचा प्रत्यय पुन्हा येऊ नये, यासाठी नायब तहसीलदार दर्जाच्या अधिकाºयांच्या अधिपत्याखाली दोन भरारी पथके नियुक्त करण्यात आली आहेत. या पथकांमार्फत गॅस व केरोसीन वितरणावर देखरेख ठेवण्यात येणार असून काळाबाजार झाल्यास फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्या सूचना तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी दिल्या आहेत.
यात्रा कालावधीत भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी आवश्यक तेवढा गॅस व केरोसीनचा कोटा उपलब्ध करण्यात आला आहे. वितरकांची नेमणूक करून ठिकाणे नेमून देण्यात आली आहेत. काळाबाजार रोखण्यासाठी पंढरपूरचे तहसीलदार मधुसूदन बर्गे यांच्या अधिपत्याखाली दोन भरारी पथकांची नियुक्ती केली आहे. भाविकांची सोय व्हावी, यासाठी आम्ही पुरेपूर नियोजन केले असून कोणाची गैरसोय झाल्यास पुरवठा विभागाशी संपर्क साधावा.
- एन. एच. पिरजादे, पुरवठा अधिकारी, पंढरपूर.