पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी सरासरी ६८ टक्के मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:21 AM2021-04-18T04:21:52+5:302021-04-18T04:21:52+5:30
मतदान प्रक्रिया व्यवस्थितरित्या पार पडवी यासाठी २६२० अधिकारी व कर्मचारी, ५५० पोलीस, १००० आरोग्य विभागाचे कर्मचारी, १३१० राखीव कर्मचाऱ्यांची ...
मतदान प्रक्रिया व्यवस्थितरित्या पार पडवी यासाठी २६२० अधिकारी व कर्मचारी, ५५० पोलीस, १००० आरोग्य विभागाचे कर्मचारी, १३१० राखीव कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ५२४ मतदान केंद्रांवर मतदान केंद्र होते. यामधील अरिहंत इग्लिश स्कूल येथील ९१ क्रमांकाच्या मतदान केंद्रावरील मतदान यंत्र बराच वेळ बंद पडले होते. परंतु त्या मतदान केंद्रावरील मतदान यंत्र बदलण्यात आले. सकाळी साडेनऊवाजेपर्यंत अवघे ६.४२ टक्के मतदान झाले.
दरम्यान दुपारी मतदानाच्या टक्केवारीत वाढ होऊन ३३.१२ टक्के मतदान झाले होते. सायंकाळी पाच वाजेपर्यंत ५७.८१ टक्के मतदान झाले. १ लाख ३ हजार ६४१ पुरुष मतदारांनी व ९३ हजार ४१४ स्त्री मतदार असे एकूण १ लाख ९७ हजार ५५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
-----
आरोग्य विभागाचे फिरते पथक
कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे प्रत्येक मतदान केंद्रावर सॅनिटाईझर, मास्क, पल्स ऑक्सिमीटर आदी साहित्य ठेवण्यात आले होते. तसेच कोरोनाच्या नियमांचे पालन होते का नाही. व मास्क व सॅनिटाईझर पोहच करण्यासाठी आरोग्य विभागाचे पथक कार्यरत होते. यामध्ये तालुका आरोग्य निरीक्षक डॉ. एकनाथ बोधले व अन्य कर्मचारी उपस्थित होते.
-----
वेळ संपण्याअगोदर गर्दी
शहरातील ४५ क्रमाकांच्या मतदान केंद्रावर मतदानाची वेळ संपण्याअगोदर मतदारांची मतदानासाठी गर्दी झाली होती. त्यामुळे मतदानाची वेळ संपल्या नंतरदेखील या मतदान केंद्रावर मतदान सुरू असल्याचे दिसून आली.
-----
कोरोना लक्षणे असणाऱ्या ४० जणांनी केले मतदान
पंढरपुरातील ६५ एकर परिसरातील कोविड सेंटर व गजानन महाराज कोविड सेंटर येथील कोरोनाची लक्षणे असणाऱ्या ४० च्या आसपास लोकांनी मतदान केले. त्या लोकांना कोविड सेंटरपासून मतदान केंद्रापर्यंत जाण्यासाठी रुग्णवाहिकेची सोय केल्याची माहिती तालुका आरोग्य निरीक्षक एकनाथ बोधले यांनी दिली.
फोटो : मतदान केंद्राबाहेर प्राथमिक आरोग्य केंद्रातील साहित्य घेऊन बसलेले कर्मचारी.