सोलापूर स्मार्ट सिटीचे सहावे सीईओ म्हणून अविनाश ढाकणे यांनी घेतला पदभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2017 01:13 PM2017-08-23T13:13:37+5:302017-08-23T13:15:06+5:30
सोलापूर दि २३ : स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीच्या कामाची प्रगती लवकरच दृश्य स्वरूपात दिसेल, अशी प्रतिक्रिया मनपा आयुक्त तथा कंपनीचे प्रभारी सीईओ डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिली.
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि २३ : स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीच्या कामाची प्रगती लवकरच दृश्य स्वरूपात दिसेल, अशी प्रतिक्रिया मनपा आयुक्त तथा कंपनीचे प्रभारी सीईओ डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिली.
सोलापूर स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीचे सीईओ संजय तेली यांनी गेल्या महिन्यात अध्यक्ष मिलिंद म्हैसकर यांच्याकडे राजीनामा सादर केला. अशाप्रकारे स्मार्ट सिटी कंपनीच्या वर्षभराच्या कारकिर्दीत दोन अध्यक्ष व पाच सीईओंनी कारभार पाहिला आहे. इतके अधिकारी बदलले, मात्र स्मार्ट सिटीच्या कामांची शहरात कुठेच चुणूक दिसत नाही. त्यामुळे स्मार्ट सिटीच्या कामांवर शहरवासीयांची नाराजी आहे. ‘लोकमत’ने ‘स्मार्ट सिटीची दशा’ या वृत्तमालिकेद्वारे यावर प्रकाश टाकला. मंगळवारी आयुक्त डॉ. ढाकणे यांनी स्मार्ट सिटी कंपनीचे सहावे सीईओ म्हणून पदभार घेतला. या वृत्तमालिकेची दखल घेत त्यांनी लागलीच कंपनीच्या सल्लागार संस्था क्रिसील व एसजीएस कंपनीच्या प्रतिनिधींच्या बैठका घेतल्या. कंपनीच्या कामांच्या प्रगतीबाबत त्यांनी आढावा घेऊन लोकांना दृश्य स्वरूपात स्मार्ट सिटीचे काम दिसण्यासाठी प्राधान्याची कामे हाती घेण्याची सूचना केली.
स्मार्ट सिटी कंपनीने सहा प्रकल्पांवर जी कामे केली आहेत, ती पूर्णत्वावर नेऊन लवकर लोकार्पण केली जातील असे आयुक्त डॉ. ढाकणे यांनी सांगितले. कामांच्या प्रगतीबाबत या दोन्ही सल्लागार संस्थांना उद्दिष्ट दिले आहे. वेळेत काम न झाल्यास दंड करण्याची ताकीद दिली आहे. ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिर परिसर सुधारण्याच्या कामावर भर देण्यात येणार आहे. तलावाभोवती बगिचा व इतर कामांबाबत अर्बन डेव्हलपमेंट व पुरातत्व विभागाच्या आवश्यक त्या परवानग्यासाठी पाठपुरावा करा अशा सूचना दिल्या. सिद्धेश्वर मंदिर परिसर सुुधारणेला प्राधान्य दिले जाणार आहे. परिसरातील बगिचा व इतर कामांचे डिझाईन तयार आहेत. आता या कामांचे टेंडर काढण्याबाबत तयारी करण्यात येत आहे.
--------------------
स्ट्रीट मार्केटला प्राधान्य
सिद्धेश्वर मंदिर प्रवेशद्वारासमोरच स्ट्रीट मार्केट भरविण्याबाबत आयुक्त ढाकणे यांनी माहिती घेण्याचे काम सुरू केले आहे. रस्त्याकडेला असलेल्या झोपड्या व दुकानांचे अतिक्रमण झाले आहे. या मार्गाबाबत यापूर्वीच झालेला मास्टर प्लान अमलात आणला जाईल.याबाबतच नेमकी काय स्थिती आहे याची फाईल त्यांनी मागविली आहे. हे अतिक्रमण हटवून मंदिर प्रवेशद्वार व दर्गाहसमोर स्ट्रीट मार्केट वसविण्यात येईल. यात्रा काळात हे मार्केट दीड महिना इतरत्र हलविले जाईल. या ठिकाणी दररोज सहा हजार लोक भेट देतात. शहराच्या दृष्टीने हा महत्त्वाचा भाग असून, तो विकसित केला जाणार आहे.