दबक्या आवाजात नामघोष अन् वाजले टाळ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:16 AM2021-07-20T04:16:53+5:302021-07-20T04:16:53+5:30
आषाढ महिन्याला सुरुवात होताच, गावोगावी वारीचे वेध लागलेले दिसतात. प्रशासन बैठका व नियोजनात दंग होत असून, गावोगावी अबालवृद्धांची वारीची ...
आषाढ महिन्याला सुरुवात होताच, गावोगावी वारीचे वेध लागलेले दिसतात. प्रशासन बैठका व नियोजनात दंग होत असून, गावोगावी अबालवृद्धांची वारीची तयारी लक्षवेधी ठरते. मात्र, गत वर्षीपासून वारी थांबल्यामुळे शेकडो भाविकांसह गावकऱ्यांच्या आनंदावर विरजण पडले आहे. मात्र, या वर्षी पालखी सोहळ्याच्या भावनिक संकल्पनेतून पूजाअर्चा विधी पार पाडला. त्यामुळे अनेक भाविकांना यंदा पालखी नसूनही श्रींच्या चरणी नतमस्तक होण्याचा योग लाभला. भाविकांनी काही अंतरावरून पायी चालून मुक्कामी स्थळी माउलींची पूजाअर्चा नैवद्यसह नामघोषाच्या गजरात पालखी सोहळ्याचा आनंद घेतला.
या ठिकाणी झाली पूजाअर्चा
जिल्ह्यात प्रवेश झाल्यानंतर पालखीचा पहिला मुक्काम नातेपुते येथे असतो. त्यामुळे या दिवशी नातेपुते येथील भाविकांनी मुक्कामाचे ठिकाण फुलांनी सजवून मनोभावे श्रींची पूजा केली. त्यानंतर, माळशिरस, निमगाव पाटी येथील विसावा वेळापूर पालखी मुक्काम ठिकाण अशा विविध ठिकाणी भाविकांनी टाळ मृदंग व नाम घोषात माउलींची मनोभावे पूजा केली. माउलींच्या पादुका मात्र शिवशाहीने पंढरपुरात पोहोचल्या.
---