खवणी ग्रामपंचायतीला ठोकले टाळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:18 AM2021-06-02T04:18:20+5:302021-06-02T04:18:20+5:30
मोहोळ : खवणी येथील ग्रामसेवक व तलाठी कोरोना काळात सतत गैरहजर राहिल्याने, या प्रकरणी वरिष्ठांना लेखी तक्रार ...
मोहोळ : खवणी येथील ग्रामसेवक व तलाठी कोरोना काळात सतत गैरहजर राहिल्याने, या प्रकरणी वरिष्ठांना लेखी तक्रार केली होती. या प्रकरणात वरिष्ठांनी दखल न घेतल्याने, संतप्त ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीला टाळे ठोकले. जोपर्यंत कारवाई होत नाही, तोपर्यंत ग्रामपंचायत कार्यालय व तलाठी कार्यालय बंद करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.
खवणी ग्रामस्थांना आरोग्य उपकेंद्र पाटकूलतर्फे लसीकरण करण्यात आले, त्यावेळीही ग्रामसेवक व तलाठी गैरहजर होते. खवणी गावात सरपंचांच्या अध्यक्षतेखाली कोरोनाबाबत घ्यावयाची काळजी व लसीकरणाबाबत बैठक घेतली होती. या बैठकीला तलाठी, आरोग्य कर्मचारी, प्राथमिक शिक्षक, विस्तार अधिकारी हे गैरहजर असल्याची लेखी तक्रार खवणी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पंढरपूर उपविभागीय अधिकारी, माेहोळचे गटविकास अधिकारी, तहसीलदार, पोलीस निरीक्षक यांच्याकडे केली होती. या प्रकरणी बेजबाबदार ग्रामसेवक व तलाठी यांच्यावर कारवाई करून, त्यांच्या ठिकाणी दुसरे ग्रामसेवक व गाव कामगार तलाठी यांची नियुक्ती करण्याची मागणी करीत, ३१ मेपासून खवणी ग्रामपंचायतीच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याचा निर्णय घेतला होता.
या निवेदनावर सरपंच शीतल यमगर, उपसरपंच सिंधू बोबडे, ग्रामपंचायत सदस्य सतीश खिलारे, रेखा भोसले, सुरेखा भोसले, भाजपा अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश सचिव संजीव खिलारे, सूर्यकांत भोसले, सचिन भोसले, महादेव यमगर, तेजस बोबडे, ज्योतीराम भोसले, निखिल भोसले देविदास भोसले, चंद्रकांत गुंड, सचिन शिंदे यांनी स्वाक्षरी केली आहे.
---
तहकूब सभा घेतली नाही
नव्याने सत्तेवर आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांची पहिली मासिक सभा ३ मार्चला घेण्यात आली. तथापि ग्रामसेवक मिलिंद तांबिले यांनी ग्रामपंचायत सदस्यांना ग्रामपंचायतीची कोणतीही माहिती न दिल्याने ही ग्रामसभा तहकूब झाली. तहकूब केलेली पहिली मासिक सभा अद्यापपर्यंत घेतली नाही. ग्रामपंचायतीचे दप्तर, बॅंक खाते पुस्तक व ग्रामपंचायतीचे दप्तर उपलब्ध करून दिले नाही, तसेच विद्यमान ग्रामपंचायत सदस्यांना ग्रामपंचायत कामकाजाबाबत कसलीही माहिती दिली नाही. याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी, मोहोळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना ५ मार्च, २०२१ रोजी तक्रार दिली होती.