कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत गृहभेटीतून जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:20 AM2021-04-12T04:20:23+5:302021-04-12T04:20:23+5:30
सांगोला शहरात सध्या १०४ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. दुसऱ्या लाटेत वृद्ध महिला व पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. एका बाजूला ...
सांगोला शहरात सध्या १०४ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. दुसऱ्या लाटेत वृद्ध महिला व पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. एका बाजूला रुग्णसंख्या वाढत असताना नागरिकांमध्ये मात्र पहिल्या लाटेत पहायला मिळणारी जबाबदारीची जाणीव कुठेतरी कमी झालीय असे चित्र आहे. कोरोना प्रसारास आळा बसावा यासाठी राज्य शासनाने कडक निर्बंध लावले आहेत. त्यामुळे शहरातील अनेक दुकाने, आस्थापना बंद आहेत. तरीदेखील अनेक नागरिक मात्र विनाकारण घराबाहेर पडून गर्दी करीत असल्याचे पहायला मिळत आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील विषाणू स्ट्रेन हा जास्त घातक व संसर्गजन्य असून लहान मुलांची देखील काळजी घेणे गरजेचे आहे. सध्या कोरोनावर लस उपलब्ध झाली आहे. लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही कदाचित कोरोना होईल. परंतु त्याची दाहकता निश्चितपणे कमी असेल. त्यामुळे लसीबाबत कुठेही गैरसमज न बाळगता लसीकरण करून स्वतःला सुरक्षित करून घेणे गरजेचे आहे.
१० प्रभागासाठी १० पथकांची नियुक्ती
कोरोना सदृश्य लक्षणे दिसत असूनही अनेकजण डॉक्टरांशी संपर्क करून कोरोना चाचणी न करता आपला आजार लपवून अंगावर काढतात. अश्याने अनेकवेळा उशीर झाल्याने नुकसान होते व आजार लवकर बरा होत नाही. उशिरा निदान, उपचार सुरू झाल्याने कोमॉरबीड, वयस्कर नागरिकांमध्ये मृत्यूचे प्रमाण देखील वाढते. या सर्व गोष्टींची सांगोला शहरातील नागरिकांना माहीत व्हावी, यासाठी १० प्रभागात १० पथके तयार करून त्यांच्यामार्फत घरोघरी भेटी देऊन नागरिकांना कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोनाबाबत सांगोला नगरपरिषदेतर्फे जनजागृती अभियान राबविले जात आहे.
कोट ::::::::::::::::::
कोरोनाच्या नियमावलीचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई करण्याबरोबरच नागरिकांमध्ये लसीकरण, कोरोना चाचणी, प्रतिकारशक्ती वाढविणाऱ्या आहाराचे सेवन या गोष्टींची देखील जाणीव होणे तितकेच गरजेचे आहे. यामुळे नगरपरिषदेमार्फत हे गृहभेटीतून कोरोना जनजागृती अभियान सुरू केले आहे.
- कैलास केंद्रे, मुख्याधिकारी, सांगोला