अप्रतिम नृत्य कौशल्य, प्रेक्षकांची मने जिंकणारी आशा पारेख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2018 04:15 PM2018-10-09T16:15:10+5:302018-10-09T16:16:51+5:30
हिंदी चित्रपटसृष्टीत १९६० ते १९८० या दोन दशकांत ज्या अभिनेत्री प्रसिद्धीच्या शिखरावर होत्या, त्यात आशा पारेख हिचे नाव वरच्या स्तरावर होते. तिचा जन्म २ आॅक्टोबर १९४२ रोजी मुंबईत झाला. तिची आई बोहरी मुस्लीम होती, तर वडील जैन होते. आशाला तिच्या आईने लहानपणापासूनच नृत्याचे धडे देण्यास सुरुवात केली. वयाच्या दहाव्या वर्षापासून ती नृत्याचे कार्यक्रम करीत असे.
प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक विमल रॉय यांना तिचे नृत्य आवडले व १९५२ साली त्यांनी तिला ‘माँ’ या चित्रपटात बालकलाकाराची भूमिका दिली. सुरुवातीच्या काळात माँ, धोबी डॉक्टर, बाप-बेटी, अयोध्या पती, उस्ताद या चित्रपटांत तिने बालकलाकाराच्या भूमिका केल्या. १९५९ मध्ये तिला नायिकेच्या भूमिकेची संधी आली होती.
चित्रपट होता ‘गुंज उठी शहनाई’ पण दुर्दैवाने तिला तो चित्रपट मिळाला नाही; पण त्याच वर्षी १९५९ साली नसिर हुसेन यांच्या ‘दिल देके देखो’ या संगीतमय चित्रपटात तिला नायिकेची भूमिका मिळाली आणि आलेल्या संधीचे तिने सोने केले. आपल्या अप्रतिम नृत्य कौशल्यामुळे व उत्तम अभिनयामुळे तिने तो चित्रपट गाजवला व प्रेक्षकांची मने जिंकली. यात तिचा नायक होता शम्मी कपूर. योगायोग पाहा, पुढे शम्मी कपूर नवीन नायिकांच्या चित्रपटाचा नायक म्हणूनच प्रसिद्ध झाला.
उदा : १) आशा पारेख- दिल देके देखो, २) सायराबानू- जंगली, ३) कल्पना- प्रोफेसर, ४) शर्मिला टागोर- कश्मिर की कली आणि पण फक्त कल्पना वगळता बाकीच्या तिन्ही नायिका प्रसिद्धीच्या शिखरावर होत्या. १९६० ते १९७० चे दशक आशा पारेखच्या बाबतीत सोन्याच्या मोलाचे ठरले. या दशकातील जवळजवळ सर्व चित्रपट अत्यंत यशस्वी ठरले व त्यामुळे आशा पारेख ही लकी नायिका ठरली. यादी पाहा १) जब प्यार किसीसे होता है- देव आनंद, शंकर जयकिसन- नासीर हुसेन हा चित्रपट सुवर्णमहोत्सवी ठरला, २) हम हिंदुस्थानी- सुनील दत्त, ३) घुंघट- प्रदीपकुमार, ४) घराना- राजेंद्रकुमार, ५) अपना बना के देखो- मनोजकुमार, ६) मेरी सूरत तेरी आँखे- प्रदीपकुमार-अशोककुमार, ७) भरोसा-गुरू दत्त, ८) जिद्दी- जॉय मुखर्जी, ९) मेरे सनम- विश्वजित, १०) तिसरी मंजील- शम्मी कपूर, ११) लव इन टोकिओ- जॉय मुजर्खी, १२) दोन बदन/उपकार- मनोजकुमार, १३) आये दिन बहार के- धर्मेंद्र, १४) शिकार- धर्मेंद्र, १५) कन्यादान/प्यार का मौसम- शम्मी कपूर, १६) चिराग- सुनील दत्त, १७) आया सावन झुमके- राजेंद्रकुमार. त्या दशकात आशा पारेख हे एक चालते नावच झाले होते. ती ज्या चित्रपटात भूमिका करीत ते सर्व चित्रपट रौप्यमहोत्सवी ठरले. तिच्या एकूण चित्रपटांची संख्या ८० होती. तिला कटी पतंग या चित्रपटातील भूमिकेबद्दल सर्वोत्कृष्ट नायिकेचे फिल्मफेअरचे पारितोषिक मिळाले. तसेच फिल्मफेअरचे लाईफ टाईम अवॉर्डही तिला मिळाले.
१९९२ साली तिला भारत सरकारने ‘पद्मश्री’ हा किताब बहाल केला. आशा पारेख ही आयुष्यभर अविवाहित राहिली. तिच्या समवयस्क नायिका १) वहिदा रहेमान, २) नंदा, ३) नृत्यांगना हेलन या तिच्या जीवलग मैत्रिणी होत्या. १९९४ ते २००० या सहा वर्षांत ती भारतीय चित्रपट सेन्सॉर बोर्डाची अध्यक्ष होती. आता तिचे वय ७६ कर्षे आहे व मुंबईत ती आनंदात जगत आहे.
-डॉ़ अरविंद बोपलकर