‘एसटी’चा अजब न्याय; सेवा प्रवाशांची, शिक्षा मात्र कंडक्टरला !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 11:48 AM2018-10-10T11:48:16+5:302018-10-10T11:49:29+5:30
नियम पाळावे की वरिष्ठांचे ऐकावे कर्मचाºयांपुढे पेच
बाळासाहेब बोचरे
सोलापूर : क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरले तर आरटीओकडून कारवाई आणि नाही भरले तर एस.टी.च्या वरिष्ठांकडून कारवाई या पेचात राज्य परिवहन महामंडळातील वाहक नावाचा कर्मचारी अडकला असून प्रवाशांची सेवा करायची तर कारवाईची टांगती तलवार सोबत घ्यायची वेळ त्यांच्यावर आली आहे.
एस.टी.च्या परिवर्तन बसमध्ये आसन क्षमतेपेक्षा ११ प्रवाशांना उभे राहून प्रवास करता येतो. त्यापेक्षा जास्त प्रवासी आढळून आले तर आरटीओ किंवा पोलिसांनी संबंधित बसचे चालक व वाहकांवर गुन्हे दाखल केल्याचे प्रकार घडले आहेत. वास्तविक गर्दीच्या वेळी बसमध्ये बसतील तेवढे प्रवासी घेतले जातात. एस. टी.नेही अशा गोष्टीला फारसा विरोध केला नाही. एखाद्या प्रवाशाला गाडीत घेतले नाही म्हणून तक्रार आली तर संबंधित वाहकांवर मात्र कारवाईचा दंडुका उगारला जातो.
कधीकधी केवळ वाहकांना त्रास देण्याच्या हेतूने एस. टी. चे अधिकारीही नियमावर बोट ठेवताना दिसतात. मे २०१८ मध्ये औरंगाबाद विभागातील सिल्लोड आगाराचे वाहक व्ही. बी. जाधव यांनी क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरल्याबद्दल एस. टी. प्रशासनाने शिक्षा म्हणून त्यांच्या वेतनात ३०० रुपये कपात केली आहे. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक केल्याबद्दल भोईसर पोलीस ठाण्यात विठ्ठल चंपत गेडाम या चालकाविरुद्ध दोन वर्षांपूर्वी गुन्हा दाखल आहे.
दि. ५ सप्टेंबर १८ रोजी शेगाव ते सांगली या शिवशाही बसमध्ये ४६ पैकी एकही जागा शिल्लक नसल्याने या बसच्या कंडक्टरने अंबड (जि. जालना ) स्थानकातून प्रवासी घेण्यास नकार दिला म्हणून त्याच्याविरुद्ध कामातील निष्काळजीपणा व प्रवाशांशी गैरवर्तन केल्याबद्दल एस. टी. प्रशासनाने कारवाई करण्याची शिफारस केली आहे. वास्तविक शिवशाही व हिरकणी या बसमधून उभे राहून प्रवास करण्यास एस. टी. नेच मनाई केली आहे. या सगळ्या घटना पाहता प्रवाशांची सेवा करायची, नियम पाळायचे की अधिकाºयांची मेहेरबानी सांभाळायची या कात्रीत राज्य परिवहनचे कर्मचारी सापडले आहेत.
...पारा चढला !
- अंबड येथे जालन्याच्या विभाग ंिनयंत्रकांनी स्वत: वाहक लोहार यांना प्रवाशांना उभे राहून प्रवास करू द्या अशी सूचना केली. या वाहकाने आपले लेखी आदेश द्या, असे म्हटल्याने अधिकाºयाचा पारा चढला आणि वाहक लोहार यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.