आयुर्वेद अन् ॲलोपॅथींच्या संघटना आमने -सामने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:24 AM2020-12-06T04:24:09+5:302020-12-06T04:24:09+5:30
सोलापूर : सरकारने आयुर्वेद शाखेतील शल्यचिकित्सकांना शस्त्रक्रियेची परवानगी दिली आहे. या निर्णयावरून आयएमए (इंडियन मेडिकल असोसिएशन) आणि निमा (नॅशनल ...
सोलापूर : सरकारने आयुर्वेद शाखेतील शल्यचिकित्सकांना शस्त्रक्रियेची परवानगी दिली आहे. या निर्णयावरून आयएमए (इंडियन मेडिकल असोसिएशन) आणि निमा (नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन) संघटना समोरासमोर आल्या आहेत.
आयुर्वेद शाखेतील शल्यचिकित्सकांना ५८ प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्यास सरकारने मान्यता दिली आहे. या निर्णयाविरोधात आयएमए (इंडियन मेडिकल असोसिएशन) आठ डिसेंबर रोजी आंदोलन तर ११ डिसेंबर रोजी संप करणार आहे. या आंदोलनाला आव्हान देत निमा (नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन) संघटना गुलाबी रिबीन बांधून काम करणार आहे. या दिवशी रुग्णसेवेत कोणतीही अडचण भासू देणार नसल्याचे संघटनेतर्फे सांगण्यात आले.
आयएमएच्या संपासंदर्भात निमाने प्रसिद्धीपत्रक काढले आहे. यात, सर्वांसाठी आरोग्य या सरकारच्या धोरणाला आयएमएने अपेक्षेप्रमाणे विरोध केला आहे. त्यांच्या प्रस्तावित संपाला निमाचा तीव्र विरोध राहील. सरकारच्या निर्णयाच्या पाठीशी ठाम राहण्याचे निमाने ठरविले आहे. त्यानुसार ११ डिसेंबरला निमाशी सर्व संलग्न रुग्णालये सुरू ठेवली जातील, असे नमूद करण्यात आले आहे.
-------
संपादिवशी जिल्ह्यात ३,४०० निमा डॉक्टर देणार सेवा
आयएमएने ११ डिसेंबर रोजी संप पुकारला आहे. या दिवशी जिल्ह्यातील आरोग्यसेवा कोलमडू दिली जाणार नाही. शहरातील १,१०० तर जिल्ह्यातील २,३०० असे एकूण ३,४०० डॉक्टर रुग्णसेवा करतील. निमाच्या राज्यातील २४९ शाखा तर देशातील १,२०० शाखांतर्फे रुग्णसेवा देण्यात येणार असल्याचे संघटनेतर्फे सांगण्यात आले.
------
कोट :
शस्त्रक्रिया करण्याच्या निर्णयाबाबत आयएमए भ्रम पसरवत आहे. प्रत्यक्षात बीएएमएस डॉक्टरांना नव्हे तर बीएएमएसनंतर एमएसचे शिक्षण घेणाऱ्या डॉक्टरांना शस्त्रक्रिया करण्यास परवानगी देण्यात आली आहे. या अभ्यासक्रमातून शस्त्रक्रियेसंबंधी प्रशिक्षण व प्रात्यक्षिक देण्यात येते. ही बाब आयएमएच्या डॉक्टरांनादेखील माहीत असून, ते संप करत आहेत. मात्र, या दिवशी आम्ही गुलाबी रिबीन बांधून रुग्णसेवा करणार आहोत.
- डॉ. विनायक टेंभुर्णीकर, राष्ट्रीय अध्यक्ष, निमा
*************