बाप-लेक एकाचवेळी 12 वी पास, मुलीच्या 'साक्षी'ने बापाचा शिक्षणप्रवास
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2022 10:32 AM2022-06-10T10:32:26+5:302022-06-10T10:33:06+5:30
सोलापूर - करमाळा तालुक्यातील कविटगाव येथील शिवाजी सरडे (वय ४५) व त्यांची कन्या साक्षी शिवाजी सरडे (१७) हे दोघे बारावीत ...
सोलापूर - करमाळा तालुक्यातील कविटगाव येथील शिवाजी सरडे (वय ४५) व त्यांची कन्या साक्षी शिवाजी सरडे (१७) हे दोघे बारावीत उतीर्ण झाले आहेत. शिवाजी सरडे हे कविटगाव येथील, तर साक्षी बारामती येथील शारदाबाई पवार विद्यानिकेतनमध्ये विज्ञान शाखेत होती. सरडे यांना १९९७ मध्ये प्रतिकूल परिस्थितीमुळे शाळा सोडावी लागली होती. त्यामुळे शिक्षण अर्धवट सोडावे लागले. याची खंत त्यांनी एकदोन वेळा घरात बोलून दाखवली होती.
यावर्षी बारावीत असणाऱ्या साक्षी व पत्नी विद्या सरडे यांच्या आग्रहामुळे त्यांनी कविटगाव येथे मच्छिंद्र नुस्ते विद्यालय येथे बहिस्थ विद्यार्थी म्हणून अर्ज भरला. बुधवारी (दि. ८) बारावीचा निकाल जाहीर झाला. त्यात शिवाजी सरडे यांना ७० टक्के, तर साक्षीला ८६.५० टक्के गुण मिळाले आहेत. साक्षी ही मल्लखांब या खेळात राष्ट्रीय खेळाडूसुद्धा आहे. पिता व कन्या सोबतच बारावी पास झाल्याबद्दल त्यांच्यावर सगळीकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. पत्रकारांशी बोलताना शिवाजी सरडे म्हणाले, आपण मुलांना शिका असं म्हणतो. असं म्हणताना आपणसुद्धा शिकले पाहिजे. आपली प्रेरणा मुले घेत असतात. त्यातूनच मीही बारावीची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. शिक्षणासाठी मी नेहमीच विद्यार्थ्यांना मदत करतो. मुलांनी शिकावे म्हणून मी त्यांना मदत करत असतो, असेही ते म्हणाले.